नागपूर : एक आठवडा उलटला तरी नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या पाच कैद्यांचा अतापता अजून पोलिसांना लागलेला नाही. ते मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशात फरार झाल्याचं समजतंय. नाही म्हणायला त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघा गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलीय.
'नही मामू से नकटे मामू अच्छे...' नागपूर पोलिसांची अशीच काहीशी धडपड दिसतेय. 31 मार्चच्या पहाटे नागपूर सेंट्रल जेलमधून सत्येंद्र गुप्त, मोहम्मद शोऐब खान, बिसेन सिंह उइके, आकाश ठाकूर आणि प्रेम नेपाली हे 5 आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरारी झाले. त्यामुळं नागपूर पोलिसांचं नाक कापलं गेलं. ते आरोपी अजून हाती लागलेले नाहीत. मात्र त्यांना पळून जाण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्या दोघांना अटक करण्यात आलीय, अशी माहिती पोलीस सहआयुक्त अनुप कुमार सिंह यांनी दिलीय.
आधीच ठरल्याप्रमाणे 31 मार्चच्या रात्री गणेश शर्मा बाईकने जेलच्या दक्षिणेला आला. मोबाईल फोनच्या माध्यमातून आधीपासूनच संपर्कात असलेले 5 कैदी बाहेर आल्यावर या झुडपाजवळ गणेश शर्माला भेटले. त्यानं बाइकच्या दोन फेऱ्या मारत, त्यांना मध्य प्रदेशच्या दिशेनं रवाना केलं. महत्त्वाचं म्हणजे, तोहीद खान आणि गणेश शर्मा यांची फरारी आरोपींशी जेलमध्येच ओळख झाली. या दोघांवर चेन स्नॅचिंग, बाइक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
दरम्यान, नागपूर जेलमधून गेल्या आठवडाभरात पोलिसांनी 50 हून अधिक मोबाईल फोन जप्त केलेत. नागपूरचा जेल आहे की मोबाईल शॉप, असा प्रश्न त्यामुळं निर्माण झालाय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.