चंद्रपूर : चंद्रपुरातल्या सावली तालुक्यामधल्या पाथरी परिसरातल्या नवेगाव बिटात वाघांचे तीन बछडे मृतावस्थेत आढळून आलेत. याच ठिकाणी वाघाचा एक बछडा जिवंत आढळला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे सारे बछडे अंदाजे दीड महिने वयाचे असल्याचं वन विभागानं सांगितलंय. दरम्यान चौथ्या जिवंत पिलावर स्थानिक वनकर्मचा-यांनी प्राथमिक उपचार करून, त्याला तातडीनं चंद्रपूर पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारा दरम्यान चौथ्या बछड्याचाही मृत्यू झाला.
बछड्यांना काही दिवस आहार किंवा दूध न मिळाल्यानं कुपोषणानं पिलांची ही अवस्था झाली असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केला आहे. या बछड्यांच्या आईच्या शोधासाठी स्थानिक स्तरावर शोधमोहीम राबवण्यात येत असून, प्रसंगी कॅमेरा संच तसंच मादीच्या पंजाच्या ठशाचाही आधार घेतला जाणार असल्याचं वन विभागानं सांगितलंय.
मृत्यू पावलेल्यांपैकी २ नर आणि २ मादी जातीचे हे बछडे आहेत. व्याघ्रवस्तीच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत उपयुक्त असल्यानं वाघांची संख्या या भागात तुलनेनं अधिक आहे. मात्र, वनविकास महामंडळाच्या वृक्ष तोडीमुळे वाघांच्या भ्रमंतीचे जंगल विस्कळीत झालंय.