पुणे : वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या पिंपरी चिंचवड आणि घाटकोपर शाखेचे व्यवस्थापक आणि दोन कर्मचारी तसेच मुंबईतील एक डॉक्टर यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात जुन्या नोटा अदलाबदलीच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय औरंगाबाद येथील एक खाजगी रुग्णालयाचेही नाव या प्रकरणात समोर येते आहे.
एकूण २५ कोटींच्या रक्कमेचा हा घोटाळा असून जुन्या नोटांच्या स्वरुपातील ही रक्कम वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या घाटकोपर येथील शाखेतून तसेच बीड येथील मुख्यालयातून १९ नोव्हेंबर रोजी बाहेर काढण्यात आली होती. त्यापैकी १५ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरली गेली.
उर्वरित १० कोटींची रक्कम (दोन हजारांच्या नव्या नोटांच्या स्वरुपातील ) पुन्हा बीडला घेऊन जात असताना १५ डिसेंबरला मुंबई पोलीसांनी चेंबूर येथे कारवाई दरम्यान पकडली होती. या प्रकरणी तपास सुरू होता. शुक्रवारी या घोटाळ्याशी संबंधीत लोकांच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि बीड येथील कार्यालये आणि घरांवर छापे घालून झडती घेण्यात आली. त्यानंतर सीबीआयने संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.