फसवणूक रोखली म्हणून एजंटनं केलं महिलेचं अपहरण

कर्जाच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्याला रोखलं म्हणून एका महिलेची पाच जणांकडून अपहरण घडवून आणल्याची घटना जळगावात घडलीय.

Updated: Mar 5, 2016, 11:02 AM IST
फसवणूक रोखली म्हणून एजंटनं केलं महिलेचं अपहरण title=

विकास भदाणे, जळगाव : कर्जाच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्याला रोखलं म्हणून एका महिलेची पाच जणांकडून अपहरण घडवून आणल्याची घटना जळगावात घडलीय.

बहिणाबाई बचत गट संस्थेसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या सरला पाटील यांच्यावर अपहरणाचा आरोप सविता भालेराव यांनी केलाय. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्जाच्या नावाखाली सरला पाटील या इतर महिलांकडून ५०० रुपयांऐवजी ३ हजार रुपये गोळा करत होत्या. त्यांना सविता यांनी मज्जाव केला होता. 

काय आहे प्रकरण... 

प्रती महिला सदस्य ५०० रुपये गोळा करून त्या बदल्यात महिलांना २ महिन्यात २५ हजार रुपये कर्जपुरवठा करण्याची योजना 'बहिणाबाई बचत गट संस्थे'ने सुरु केलीय. मात्र, एजंट सरला पाटील या प्रत्येक महिलेकडून तीन हजार रुपये गोळा करत होत्या, याबाबत अनेक महिलांनी तक्रार केल्यावर याचा जाब संस्थेच्या कर्मचारी सविता भालेराव यांनी सरला पाटील यांना विचारला होता.

त्याचाच राग येऊन पाच जणांकडून सविता भालेराव यांचे १ मार्चला अपहरण करण्यात आले. यावेळी जंगलात नेऊन आपल्याला मारहाणदेखील करण्यात आली. मुंबईला नेऊन आपल्याला विकण्याचा अपहरणकर्त्यांचा प्रयत्न होता, असा आरोप सविता भालेराव यांनी केलाय. 

दरम्यान, एका पेट्रोल पंपावर गाडी थांबल्यावर आपण अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलो, असे सविता यांनी म्हटलंय. सविता यांच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना घडल्यानंतर अनेक फसवणूक झालेल्या महिला जिल्हा रुग्णालयात गोळा झाल्या होत्या.