विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: 'पुत्र व्हावा ऐसा ज्यानं त्रिलोकी लावावा झेंडा' अशी प्रत्येक आईची आपल्या मुलाबाबत इच्छा असते. जी आई आपल्या मुलाबाळांवर जीव ओवाळून टाकते अशाच एका आईला वृद्धत्वामुळं तीच्याच मुलांनी रस्त्यावर सोडून दिल्याची दुर्देवी घटना औरंगाबादेत समोर आली आहे. मातेच्या मातृत्वालाच या घटनेनं काळीमा फासलाय. जाणून घ्या या आईची ही करूण व्यथा...
स्वामी तीन्ही जगांचा... आई विना भिकारी... असं म्हणतात... मात्र ज्या आईनं ९ महिने पोटात वाढवलं... शिकवून मोठा करण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या आईलाच तिच्या वृद्धापकाळात रस्त्यावर सोडून देण्याचा निर्लज्ज प्रकार औरंगाबादमध्ये उघड झालाय. गेल्या चार दिवसांपासून या आज्जी रस्त्याच्या कडेला अशाच पडून आहेत... खायला अन्न नाही... पांघरायला चादर नाही... अशी अवस्था... वृद्धत्वामुळे चालता-बोलता येत नाही... मदत मागणार तरी कशी?
रस्त्याच्या शेजारी पहूडलेल्या या आजीला तीच्या मुलानंच या ठिकाणी सोडून पळ काढलाय. उस्मानपूरा भागातील चौकातच या मातेला सोडून तीन दिवसांपूर्वी तीचा मुलगा पळून गेलाय. सुरुवातीला कुणी भिखारी असावी म्हणून नागरिकांनी एक दिवस दुर्लक्ष केलं मात्र दुसऱ्यादिवशीही त्याच ठिकाणी पडून असलेली आजी पाहून नागरिकांनी चौकशी केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला.
त्यानंतर नागरिकांनी स्वत: आजीच्या खाण्यापिण्याची तर सोय केलीच त्याचबरोबर तिला झोपण्यासाठी गादी, चादर आणि आडोशाची सुद्दा व्यवस्था केली. तिला वृद्धाश्रम सेवाभावी संस्था या ठिकाणी हलवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. मात्र तिथंही कायद्यामुळं त्यांना दाद मिळाली नाही. औरंगाबादच्या नारेगावमध्येच माझं घर असल्याचं ही माऊली सांगते, मात्र घरी जाण्यास ती साफ नकारही देतेय.
आणखी वाचा - नोकरीचं आमिष दाखवून महिलेची विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड
गेली तीन दिवस परिसरातील नागरिकांनी तीची काळजी घेतली.. मात्र तीची कुठं तरी सोय व्हावी असं नागरिकांचं मत आहे.. नाहीतर पोलिसांनी तिच्या मुलांना शोधून तिला घरी तरी पाठवालं असही नागरिक सांगतायेत. त्यातच पोलिसांना सांगूनही पोलिसांनी सुरुवातीला याकडं दुर्लक्ष केलं असा नागरिकांचा आरोप आहे.
मात्र तिसऱ्या दिवशी नागरिकांचा घोळका पोलीस ठाण्यावर धडकला आणि त्यानंतर मात्र पोलिसांना जाग आली. पोलिसांनी आता या मातेला उपचारासाठी दवाखान्यात हलवलं आहे, तर तिच्या मुलांचाही पोलीस शोध घेताय. मात्र जन्मदात्री आईलाच मुलं अशा पद्धतीनं सोडून देत असतील तर खरचं यांना मुलं म्हणावी की हैवान असा प्रश्न या निमित्तानं उभा ठाकतोय.
आणखी वाचा - पुण्याच्या दोघा तरुणींचे अपहरण करुन बलात्कार, त्यानंतर बियर पाजली आणि...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.