बीड: नवी मुंबई प्रमाणे बीड जिल्ह्यातील परळी इथं धक्कादायक घटना घडलीय. मागील १६ वर्षांपासून आपल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला परळी पोलिसांनी अटक केलीय. दोन वेळा ही मुलगी गरोदरही होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील परळी इथं पीडित मुलगी आपल्या आई आणि ४८ वर्षीय वडिलांसोबत राहते. काल रात्री पीडित मुलीनं बीड शहरात आपल्या वडिलांविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर ही तक्रार परळीमध्ये स्थानांतरीत करण्यात आली.
आपल्या कुटुंबियांसोबत राहणाऱ्या या मुलीवर तिचे वडील मागील १६ वर्षांपासून बलात्कार करत होते. मुलगी गरोदरही राहिली आणि तिनं एका मुलीला जन्म दिला. त्यानंतरही आरोपीनं तिच्यावर अत्याचार करणं सुरूच ठेवलं. तीन महिन्यांपूर्वी मुलगी पुन्हा गरोदर राहिली. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला.
मुलीनं मंगळवारी पोलीस अधिक्षक अनिल पासरकर यांची भेट घेऊन आपली आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांसमोर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितलं की, पीडित मुलीच्या आईलाही हा संपूर्ण प्रकार माहिती होता. तिनंही नराधम नवऱ्याला मदत केली. पोलिसांनी दोघांना अटक करून स्थानिक कोर्टात हजर केलं. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.