विवस्त्र करून तरुणांना मारहाण, ‘व्हॉटस्अप’मुळे घटना उघड!

बेळगावात एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. केवळ, प्रेमविवाहासाठी एका जोडप्याची मदत केली म्हणून दोन तरुणांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आलीय. 

Updated: Nov 15, 2014, 12:02 PM IST
विवस्त्र करून तरुणांना मारहाण, ‘व्हॉटस्अप’मुळे घटना उघड! title=

बेळगाव : बेळगावात एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. केवळ, प्रेमविवाहासाठी एका जोडप्याची मदत केली म्हणून दोन तरुणांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आलीय. 

सुरेश घाटगे या गुंडासह सहा जणांना या प्रकरणात अटक करण्यात आलीय. घाटगे हा बेळगावचे आमदार संजय पाटील यांचा कार्यकर्ता असल्याचं समजतंय.  

सुरेश घाटगे याच्या भावाच्या मुलीनं प्रेमविवाह केलाय. या विवाहाला तिच्या कुटुंबीयांचा प्रखर विरोध होता. परंतु, दोन तरुणांच्या मदतीनं या जोडप्यानं कोर्ट मॅरेज केलं... यावेळी, या दोन तरुणांनी त्यावर सह्या केल्या होत्या. हाच राग मनात धरून घाटगेनं या दोन तरुणांना आपल्या ‘ताकदी’च्या जोरावर विवस्त्र करून हॉकी स्टिकने मारहाण केली. बेळगावाजवळच्या बेळगुंदी गावात ही घटना घडलीय.

इतकंच नाही तर, निर्लज्जपणे हा सगळा प्रकार मोबाईलवर चित्रितही करण्यात आला... आणि तो व्हॉटसअपवर शेअरही करण्यात आला. हा व्हिडिओ लिक झाल्यानंच हा प्रकार उघडकीस आलाय. ३ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडल्याचं समजतंय.

मारहाण करण्यात आलेल्यांपैकी अनिल नागरदाळे या तरुणांना याच व्हिडिओ क्लिपचा आधार घेत पोलीस स्टेशन गाठलं. पण कर्नाटक पोलीस आमदारांच्या दबावामुळे कारवाई करायला टाळाटाळ केली. अखेर, काकटी पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर घाटगेसह सहा जणांना अटक करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.