महाड : सावित्री नदीवरील पूल धोकादायक आहे... हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं सूतोवाच महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत केलं होतं.
३० जुलै २०१५ रोजी गोगावले यांनी सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन बांधल्या गेलेल्या पुलाविषयी प्रश्न उपस्थित केला होता. हा पूल पावसाळ्यात कोणत्याही क्षणी कोसळू शकतो आणि मोठी दुर्घटना घडू शकते, असे गोगावले यांनी या प्रश्नाच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.
त्यावर हा पूल तांत्रिकदृष्ट्या सक्षम असून त्यावरून वाहतूक सुरळीत असल्याचे लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी विधानसभेत दिलं होतं.
केंद्रीय मंत्र्यांनी लावली उपस्थिती
दरम्यान आज केंद्रीय अवजड उद्योग अनंत गिते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दुर्घटनेला काहीप्रमाणात बेसुमार वाळू उपसा जबाबदार असल्याचं यावेळी अनंत गितेंनी मान्य केलं.
शिवाय मृतांच्या नातेवाईकांनी योग्य ती आर्थिक मदत देण्यात येईल असंही गितेंनी म्हटलं. एनडीआरएफनं सुरु केलेल्या शोध मोहिमेविषयी हंसराज अहिर यांनी माहिती घेतली. आणि अधिका-यांना सूचना केल्या.