मुंबई : रिक्षा, टॅक्सीचे दर एकीकडे वाढत चाललेत... प्रवास करायचा कसा...? असा प्रश्न पडला असताना स्वस्त दर... मस्त प्रवास... आणि अधिक मायलेज देणारा एक नवा पर्याय समोर आलाय. तो म्हणजे बायोडिझेलचा...
क्रूड ऑईल आयात करणारा आणि वापरणारा भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे. या तेल आयातीसाठी भारत वर्षाला अंदाजे साडे आठ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करतो. आयात तेलापैंकी 44 टक्के हिस्सा डिझेलचा असून भारतास वर्षाला 8 हजार कोटी लिटर डिझेलची गरज लागते. इतक्या मोठ्या प्रमाणात डिझेल वापरामुळं पर्यावरणाचे होणारे नुकसान तर न मोजता येणारे. या दोन्ही समस्यांवर मात करणारा उपाय म्हणजे बायोडिझेलचा वापर वाढवणे…
माय इको एनर्जी कंपनी ‘इनडिझेल’ नावानं पहिला बायोडिझेल पंप पुण्यातील लोणीकंद इथं 14 ऑगस्टपासून सुरु करत आहे. कंपनी आगामी काळात महाराष्ट्रात असे 500 बायोडिझेल पंप आणि 2 ते 3 हजार आऊटलेट्स सुरु करणार आहे, अशी माहिती माय इको एनर्जीचे संचालक हृषीकेश कुलकर्णी यांनी दिलीय.
डिझेलच्या तुलनेत बायोडिझेल एक ते दीड रुपयांनी स्वस्त असेल. बायोडिझेल वापरासाठी गाडीच्या इंजिनमध्ये कुठलाही बदल करावा लागणार नाही. बायोडिझेल वापरामुळं अधिक मायलेज तर मिळतेच, शिवाय कार्बनडायऑक्साईडचे उत्सर्जनही 90 टक्क्यांनी कमी होते, असंही कुलकर्णी यांनी म्हटलंय.
कोणत्याही सबसिडीविना बायोडिझेल आयात होणाऱ्या डिझेलपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळं सरकारनं बायोडिझेल उत्पादकांना सहकार्य करणं गरजेचं आहे. यामुळं परकीय चलन बचतीबरोबरच पर्यावरण संरक्षणही साध्य होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.