ठाणे : जलसंकट दिवसेंदिवस वाढत असताना पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या प्रकल्पांचा फेरविचार सुरु असतानाच ठाण्याच्या घोडबंदर रोडवर राहणाऱ्या अवघ्या १३ वर्षाच्या मानस महेश गर्गे या विद्यार्थ्याने मात्र पाण्याची नासाडी न करता स्वयंचलित पाणीपुरवठा करणारे यंत्र तयार केले आहे.
या प्रकल्पाला मनसने स्मार्ट वॉटर कन्झर्वेशन सिस्टीम असे नाव दिले आहे. चिमुरड्याने या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला आहे. ठाण्याच्या सरस्वती विद्यालयात शिकणारा मानस गर्गे याने चाईल्ड टेक सेंटर येथे विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याने या प्रकल्प अवघ्या तीन महिन्यात उभा केला.
यासाठी मानसने पुठ्ठा, बॉटल्स, मोटार, नळी, सेल, सॉईल मॉईश्चर सेन्सर याचा वापर केला आहे. त्याने वॉटर प्लांट इंडिकेटर, वॉटर लेव्हल इंडिकेटर, ऑटोमॅटिक वॉटरिंग सिस्टीम फॉर प्लांट आदी यंत्र तयार केली. त्याच्या या कल्पकतेबाबत त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.