नागपूर : ‘राजकारणात चर्चेची दारं कधीही बंद होत नसतात,’ असं सूचक विधान करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काळात भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. असं झालं तर मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात सेनेला स्थान मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
देवेंद्र फडणवीस शनिवारपासून नागपूर दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’वर पत्रकारांशी बातचीत केली. नागपूर इथं ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी म्हणजे २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचं फडणवीस म्हणाले. या विस्तारात सेनेला स्थान असेल काय, असा सवाल त्यांना केला असता त्यांनी ‘राजकारणात चर्चेची दारं कधीही बंद होत नसतात. दोन्ही बाजूंनी सध्या हीच भावना बळावत आहे’, असं सूचक विधान केलं.
त्यामुळं पुढच्या काळात हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र होण्याची शक्यता बळावली आहे. शिवसेनेची मदत न घेता फडणवीस सरकारने आवाजी मतदानाने विश्वासमत प्रस्ताव जिंकला असला, तरी राष्ट्रवादीच्या मुद्द्यावरून भाजपावर चांगलीच टीका होत आहे. टीकेचा रोख मुख्यमंत्र्यांवरही अधिक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला अधिक महत्त्व आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.