नाशिक : आघाडी आणि महायुतीच जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसताना प्रचार सभेच्या जागेवरून नाशकात राजकारण सुरु झालंय. सर्वच राजकीय पक्षाचं हॉट फेवरेट असणा-या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानवरुन सामना रंगलाय.
नाशिकच्या मध्यवर्ती भागातलं हे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान. या मैदानावरची सभा गाजली तर विजय निश्चित. असं आजवरचं समीकरण. म्हणूनच राजकीय पक्षांचं हे मैदान हॉट फेवरेट. त्यामुळेच दहा, अकरा, बारा ऑक्टोबर असे तीन दिवस मैदान राखीव ठेवण्यासाठी शिवसेनेनं अर्ज केला होता. मात्र इतर पक्षांवर अन्याय होईल असं कारण देत महापालिका प्रशासनानं अर्ज फेटाळला. फक्त १० तारखेला उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात आलीय. यावरुन शिवसेना-मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगलेत.
महानगर प्रमुख शिवसेना अजय बोरस्ते म्हणालेत, आम्ही रितसर परवानगी मागितली आहे. मात्र, सत्ताधारी मनसेचा डाव आहे. येथे राजकारण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसेने प्रशासनाची भूमिका बरोबर असल्याचे म्हटले आहे. एकाच पक्षाला तीन दिवस मैदान कसे देता येणार? बाकीच्यांनी काय करायचे? सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे मनसेच्या माजी गटनेत्या सुजाता डेरे यांनी सांगितले.
राजकीय पक्ष जाहीर सभांसाठी राजकीय खेळी खेळत असताना मात्र ज्यांच्यासाठी हे मैदान सुसज्ज करण्यात आलं त्या खेळाडूंना दोन महिने आता या मैदानवर कुठलाही खेळ खेळता येणार नाही, असे प्रशिक्षक मंगेश शिरसाठ यांनी म्हटलेय.
नाशिक शहरातली अकरा मैदानं राजकीय सभांसाठी राखीव ठेवण्यात आलीयत.याच मैदानांवर आता राजकीय आखाडे रंगतायत. येत्या काही दिवसांत हा वाद आणखी रंगणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.