दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार

दुष्काळाची पावले ओळखून चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेल्या इरई नदीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रारंभ केला आहे.

Updated: Apr 10, 2016, 08:55 PM IST
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नदीचं खोलीकरण होणार title=

चंद्रपूर : दुष्काळाची पावले ओळखून चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेल्या इरई नदीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रारंभ केला आहे. जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग यांनी तयार करून दिलेल्या आराखड्यानुसार ही कामं होणार असून यासाठी ८४ कोटी रूपयेचा निधी मंजूर करण्यात आलाय.

शहराला वळसा घालणारी ही नदी सततच्या पूर आणि वाळू उत्खननामुळे सपाट झाली आहे. त्यातच या नदीच्या एका टोकाला असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राखयुक्त पाणी या नदीत शिरकाव करत असल्यानं नदीचे पात्रही उथळ झालय. 

२ महिन्यापूर्वी शहरात आलेल्या जलपुरुष राजेंद्रसिंग यांच्यापुढे ही समस्या आल्यावर त्यांनी यावर सविस्तर उपाय सुचवले होते. त्यानुसार नव्या प्रकल्पात नदी खोल करणे, गाळ काढणे आणि शहराच्या आसपास पूर संरक्षक भिंत उभारणं ही कामे केली जाणार आहेत. याशिवाय ११० किमीच्या या नदीवर ९ साखळी बंधारे बांधले जाणार आहेत.

सुमारे ३ वर्षाच्या कालबद्ध कार्यक्रमात आता इरई नदीचं पुनरुज्जीवन केले जाणार आहे. या नदीपात्रातून निघणारा सुपिक गाळ शेतक-याच्या बांधावर पोहचवून शेतजमिनीचा पोत सुधारण्याचे प्रयत्नही केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची हमी खुद्द अर्थमंत्र्यांनी घेतल्याने इरई नदीचे पुनरुज्जीवन सफल होण्याची चिन्हे आहेत.