मुंबई : मनसेचं निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनानं त्याची दिशा पुन्हा बदलली आहे. मनसेचं हे इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावायला लागलं आहे.
राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत 2006 साली मनसेची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या परीक्षेत म्हणजेच 2007 साली झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी मनसेला अधिकृत चिन्ह मिळालं नव्हतं. यामुळे मनसेनं ही निवडणूक कपबशी आणि विमान अशा चिन्हांवर लढली.
2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं जोरदार मुसंडी मारली आणि त्याच्याच जोरावर मनसेला इंजिन हे चिन्ह मिळालं. 2009 ची विधानसभा निवडणूक मनसे पहिल्यांदा लढली ती या इंजिनाच्या चिन्हावर. तेव्हा हे इंजिन होतं उजवीकडून डावीकडे जाणारं होतं.. या इंजिनात बसून पहिल्याच फटक्यात 13 आमदार विधानसभेत दाखल झाले.
तेव्हापासून मनसेच्या इंजिनाची शिट्टी जोरात वाजायला लागली, पण उजवीकडून डावीकडे जाणारं मनसेचं इंजिन अनेकांना खटकायला लागलं. आणि मराठी संस्कृतीप्रमाणे मराठी लिखाणाप्रमाणे मनसेचं इंजिन डावीकडून उजवीकडे नेण्याचं ठरलं.
इंजिनानं दिशा बदलली आणि 2012च्या महापालिका निवडणुकीत मुंबईत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले. नाशिकमध्ये महापालिका ताब्यात आली आणि पुण्यात विरोधी पक्षनेतेपद मिळालं. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचं पार पानिपत झालं. विधानसभेला आमदारांची संख्या 13 वरुन फक्त 1 वर आली.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत 27 नगरसेवकांचे 9 नगरसेवक झाले. पक्षाची एवढी अधोगती का, यावर खल सुरू झाला आणि इंजिनाची बदललेली दिशा यालाही पराभवाचं एक कारण मानण्यात आलं. म्हणूनच मनसेचं इंजिन पुन्हा यार्डात गेलं आणि मनसेचं इंजिन पहिल्यासारखंच म्हणजे उजवीकडून डावीकडे धावायला लागलं.
यशवंत नाट्यमंदिर सभागृहात नुकत्याच झालेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिशा बदललेलं हे इंजिन पुन्हा कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं आणि कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले. यापुढे मनसेच्या पक्षाच्या अधिकृत पोस्टर्सवर हे दिशा बदललेलं इंजिन आता आवर्जून दिसू लागलंय. पण मधल्या काळात इंजिनानं इतके यू टर्न घेतलेत, की इंजिनाला दिशाच कळेनाशी झालीय, अशी कुजबूज आहे.
इंजिनानं तोंडानं नुसत्याच वाफा सोडून उपयोग नसतो. मुळात इंजिनाचा मेन्टेनन्स ठेवावा लागतो, त्यासाठी काम करावं लागतं, तर इंजिन वेगात धावेल. एकंदरीतच या गोष्टीचं तात्पर्य काय की दिशा बदलली तरी दशा बदलत नाही, ती बदलून दाखवावी लागते.
पाहा मनसेच्या इंजिनाबाबतचा खास रिपोर्ट