रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर मंत्रोपचार, उपचाराअभावी मृत्यू

पुरोगामी महाराष्ट्रानं शरमेनं मान खाली घालावी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सर्पदंश झालेल्या एका रुग्णावर, रुग्णालयातच सरकारी महिला डॉक्टरच्या उपस्थितीतच गावठी उपचार करण्यात आले. यात अखेर रुग्णालयातच रुग्णाचा मृत्यू झाला. 

Updated: Sep 9, 2016, 07:32 PM IST
रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर मंत्रोपचार, उपचाराअभावी मृत्यू title=

आशिष अंबाडे, चंद्रपूर : पुरोगामी महाराष्ट्रानं शरमेनं मान खाली घालावी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सर्पदंश झालेल्या एका रुग्णावर, रुग्णालयातच सरकारी महिला डॉक्टरच्या उपस्थितीतच गावठी उपचार करण्यात आले. यात अखेर रुग्णालयातच रुग्णाचा मृत्यू झाला. 

चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयातलं सीसीटीवीतलं हे चित्रीकरण राज्याच्या आरोग्य व्यवस्थेकरता लाजिरवाणं असंच आहे. वरोरा तालुक्यातल्या चारगाव-खुर्द इथले बालाजी वाढई शेतात काम करत असताना, त्यांना साप चावला. त्यांना वरोरा शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टर यमुना मडावी यांनी साप विषारी होता की बिनविषारी यावर काथ्याकूट करत, बालाजी वाढई यांच्यावर अडीच तास प्रथमोपचारच केला नाही. त्यानंतर वाढई यांना कडुलिंबाचा पाला खाऊ घालायचे आदेश रुग्ण सहाय्यक सुरेश देशमुख यांना डॉक्टर यमुना मडावी यांनी दिले. हे कमी म्हणून की काय वाढई यांचं विष उतरवण्याकरता रुग्णालयातच त्यांच्यावर मंत्रोपचारही केले गेले. त्यामुळे योग्य उपचारांअभावी बालाजी वाढई यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. 

या प्रकरणी डॉक्टर यमुना मडावी यांची चौकशी केली जात असल्याचं, वरोरा उपजिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोपाळ भगत यांनी म्हटलंय. तर दोषी डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केलीय. 

ग्रामीण भागात सर्पदंशावरच्या गावठी उपचारांमुळे असंख्य रुग्ण दगावतात. ते टाळण्यासाठी डॉक्टरची भूमिका महत्त्वाची असते. मात्र चंद्रपूरमध्ये स्वतः डॉक्टरांकडूनच याला छेद दिला गेला हे संतापजनक असंच आहे.

'झी २४ तास'च्या वृत्तानंतर... 

दरम्यान, या अघोरी उपचाराच्या 'झी २४ तास'च्या बातमीची चंद्रपूर जिल्हा आरोग्य प्रशासनानं गंभीर दखल घेत, वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर यमुना मडावी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय.