योगेश खरे, नाशिक : गंगा - गोदावरीच्या पवित्र पाण्यात मानससरोवारचे पाणी मिसळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशावर्त अपवित्र केलंय, असं म्हणणं आहे द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं... एव्हढचं नाही तर, मुख्यमंत्र्यांच्या या कर्तुत्वामुळे ते हिंदू आहेत की नाही असा सवालही त्यांना पडलाय.
संतप्त झालेल्या शंकराचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना गोदावरीचं महात्म्य ठाऊक नसल्याचं सांगत देशाविरुध्द कारवाया करणाऱ्या चीनचं पाणी आणून काय साध्य केलं, अशी विचारणां केलीय. मात्र यावेळी, शंकराचार्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना मात्र 'उत्तम कामाची' पावती दिलीय.
अधिक वाचा - माणसाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसाने मारली पुलावरून उडी
गोदावरीचं उगमस्थान असलेल्या कुशावर्तात दर बारा वर्षांनी देश परदेशातील साधू-महंत स्नान करतात. या काळात तेहत्तीस कोटी देवही हा सोहळा पाहण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे. या पाण्यात स्नान केल्यानं आयुष्यात केलेली पापं धुतली जातात, अशीही श्रद्धा असल्यानं कोट्यावधीच्या संख्येने भाविक इथे जमतात. इतके पवित्र पाणी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानसरोवरमधून पाणी आणून कुशावर्तात जलाभिषेक केला, हे अनेक साधूमहंतांना रुचलेले नाही. कुंभमेळ्यात कुठलेही काम आखाडा परिषद वा शंकराचार्य यांना विश्वासात घेतल्याशिवाय होत नाही. मात्र, शत्रुराष्ट्र चीन आपल्या देशाविरोधात सातत्यानं कारवाया करीत आहे. त्यांनी आपला भूभागही बळकावला आहे, असं असताना या राष्ट्राचं पाणी आणून कुशावर्तता केलेला जलाभिषेक खटकल्याचं शंकराचार्यांचं म्हणणं आहे.
गंगा गोदावरीच्या पाण्यात स्नान करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल नाशिकमध्ये दोन दिवस मुक्कामी होत्या. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान या ठिकाणी येऊन गेलेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही कुटुंबासह स्नानाचा लाभ घेतला. त्यातच यजमान असलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्नान न केल्यानं सर्व साधू महंतांमध्ये गोदावरीचा अपमान केल्याची चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.