अकोला : कोपर्डी आणि आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी काळे झेंडे दाखवणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला.
अकोला येथील मल्टीस्पेशलिटी रूग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर कोपर्डी आणि आरक्षण प्रश्नावर नेहरूपार्क चौकात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लवकर करवाई करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिली. या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्र्यांना शहरातील खराब रस्त्यांप्रश्नी आंदोलन करणाऱ्या 30 काँग्रेस कार्यकर्त्यांना सीटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, राज्यातील काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन बेकायदेशीर प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अकोला येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अशा महाविद्यालयांना सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर फौजदारी करवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मल्टीस्पेशलिटी रूग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पुरवठामंत्री गिरीश बापट, डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थित होते.
दरम्यान, याच कार्यक्रमात अकोल्यातील मुख्य रस्त्यांसाठी 100 कोटींचा सर्वंकष आराखडा तयार करण्याच आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. हा निधी मोठ्या रस्त्यांसाठीच वापरा , गल्लीतल्या रस्त्यांसाठी नव्हे, असं मिश्किलपणे मुख्यमंत्री म्हणाले. आपण महापालिकेत असतांना मात्र असंच करायचो, असं गमतीदार वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्री नागपूर महापालिकेत नगरसेवक आणि महापौर होते.