बीड : भगवानगड वादाप्रकरणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेली माघार म्हणजे त्यांची राजकीय खेळी असल्याचे विधान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलं आहे. गडाच्या विकासासाठीच आपण गादीवर बसलो असून कीर्तनकाराशिवाय इथं कोणाचाच आवाज निघणार नाही असंही नामदेवशास्त्री यांनी ठणकावलं आहे.
पंकजा मुंडे यांना सौजन्याने वागायचे असेल तर त्यांनी गडावर भाषण करणार नाही असं जाहीर करावं तेव्हाच हा वाद संपेल असंही नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे. तर नामदेवशास्त्रींच्या या विधानाबाबत विचारलं असता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सूचक मौन बाळगलं आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यात वाद झाला होता.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीमध्ये पंकजा मुंडेंनी गोपीनाथगड उभारलं. तेव्हापासून महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील दरी वाढत चालली आहे.