मुंबई : ठाण्यात कापूरबावडीहून रिक्षातून जाणाऱ्या स्वप्नाली लाड अपघात प्रकरणी तीन संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलीत. हे संशयित कोण आहेत? याचा शोध घेण्यासाठी आता रिक्षाचालकही पुढे आलेत. दरम्यान, गंभीर जखमी झालेली स्वप्नाली अद्यापही कोमात आहे.
ठाण्यात, गेल्या शनिवारी रात्री 9.30 वाजल्यादरम्यान स्वप्नाली लाड ही ‘टीसीएस’ या कंपनीत काम करणारी २४ वर्षीय तरुणी कापुरबावडी येथून घरी जाण्यासाठी एका रिक्षात बसली. यावेळी रिक्षा काल्ह्लेर दिशेने जात असल्याचे तिज्या लक्षात येताच तिने आरड-ओरडा केला. मात्र, रिक्षा चालक रिक्षा थांबवत नसल्याने तिने धावत्या रिक्षातून उडी मारल्याने तरुणीच्या डोक्याला दुखापत होऊन कोमात गेली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्या तिघांचा अद्यापही शोध सुरू...
धावत्या रिक्षेतून उडी मारल्याने जखमी झालेल्या स्वप्नाली लाड या ठाण्यातील इंजिनीअर तरुणीच्या मदतीसाठी आलेल्या रहिवाशांना बाईकवरुन आलेल्या तिघांनी दमदाटी केल्याचे उघड झाले आहे. 'तिला मदत करू नका,' असा दम त्यांनी रहिवाशांना दिला. त्यामुळे हे तिघे कोण होते व त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी त्यांची रेखाचित्रं जारी केली आहेत. रिक्षात स्वप्नालीसोबत नेमकं काय घडलं याचा अजुनही तपास लागलेला नाही.
महिला रिक्षा चालकांना परवाना देण्याची मागणी...
या प्रकरणात रिक्षा चालक आणि रिक्षा युनियन नेत्यांनी गंभीर दखल घेतलीय. रिक्षा चालक आणि रिक्षा युनियन नेत्यांनी नुकतीच एक बैठक घेतली. यावेळी, रिक्षा चालक दोषी आढळल्यास त्याचं लायसन्स रद्द करण्यासाठी युनियन पुढाकार घेईल, असा निर्णय घेण्यात आला. तसंच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिला रिक्षा चालकांना परवाना देण्यात यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.