नागपूर : जीव गेल्यानंतर मोक्ष मिळवून देणारा कावळा जर जिवंतपणीच जीवघेणा झाला तर? विश्वास बसत नाही ना? मात्र, हे प्रत्यक्ष घडतंय नागपूरच्या एका रिक्षाचालकाच्या आयुष्यात…
नागपूरच्या सावित्रीबाई फुले नगरात रहाणाऱ्या राजू मेश्राम या रिक्षाचालकाचं घरातून बाहेरपडणं मुष्कील झालंय. त्यांना त्यांच्या राहत्या घरात जायबंदी केलीय ते दोन कावळ्यांनी... दोन कावळे चक्क दिवसभर त्यांच्यावर पाळतच ठेऊन असतात आणि ते बाहेर पडले की आळीपाळीनं त्यांच्यावर हल्ला करतात.
कावळ्यांच्या या हल्ल्याची सुरूवातही अगदी अनपेक्षीतपणेच झाली. तीन आठवड्यांपूर्वी मेश्राम पाणी भरत असताना कावळ्यानं अचानाक त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा चावा घेतला.
राजू यांच्या घरात पाच सदस्य आहेत मात्र राजू वगळता त्यांपैकी अन्य कोणालाही या कावळ्यांचा त्रास नाही... कुटुंबासोबत जातानाही कावळा नेमका राजू यांना हेरतो आणि त्यांच्यावरच हल्ला करतो. अगदी गाडी चालवतानाही हे हल्ले होतात. त्यामुळे अनेकदा ते अपघातातून वाचलेत. या कावळ्यांची राजू यांना आता इतकी दहशत बसलीय की घराबाहेर पडायलाही ते आता घाबरतात.
कावळ्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी राजू यांनी अनेक प्रयत्न केले. ‘ब्राम्हणांना विचारलं... पक्षी निरिक्षकांचे सल्ले घेतले... त्यांच्या सांगण्यावरून स्वत:चा गेटपही बदलून पाहिला... मात्र, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही... अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली... मात्र, तिथेही हसं झालं...’ असं रडकुंडीला आलेले मेश्राम सांगतात.
कावळ्यांच्या दहशतीमुळं ते गेल्या 20-25 दिवसांपासून घरातच बसून आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार, असा प्रश्न त्यांच्या पत्नी रत्ना यांना पडलाय.
कावळ्याचं घरटं मोडलं असेल किंवा त्याला त्रास दिला असेल म्हणून हे हल्ले होत असावेत, असा पक्षी निरिक्षकांचा कयास आहे. मात्र, यापैंकी कोणतही कारण नसेल तर कावळ्यांच्या या वर्तणूकीचं संशोधन करणं गरजेचं आहे, असं मत पक्षी निरिक्षक कुंदन हाते यांनी व्यक्त केलंय.
स्वच्छता-दूत ही कावळ्याची एक ओळख... पिंडाला चोच मारून कावळा मोक्ष प्राप्ती करून देतो, अशी मान्यता... मात्र, जिवंतपणे होणारा हा काक-स्पर्श राजू मेश्रामकरता जीवघेणा ठरतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.