वाहतुकीचा कायदा मोडणाऱ्याला अनोखी शिक्षा

वाहतुकीचा एखादा नियम मोडला तर या गुन्ह्याच्या स्वरुपात तुमच्याकडून दंड वसूल केला जातो.

Updated: Dec 7, 2016, 10:44 PM IST
वाहतुकीचा कायदा मोडणाऱ्याला अनोखी शिक्षा title=

कोल्हापूर : वाहतुकीचा एखादा नियम मोडला तर या गुन्ह्याच्या स्वरुपात तुमच्याकडून दंड वसूल केला जातो... किंवा नियम मोडणा-याला समज दिली जाते. कोल्हापुरात मात्र वाहतुकीचे नियम मोडणा-या एकाला अनोखी शिक्षा देण्यात आली.

ट्रॅफिक पोलिसाकडून वाहतूक नियमांचे धडे घेणारा हा आहे कोल्हापुरातला जगन्नाथ मुगडे... 2012 साली अल्पवयातच जगन्नाथनं वाहतुकीचा नियम मोडला.. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं.. मात्र गुन्हा घडला त्यावेळी जगन्नाथ अल्पवयीन असल्याने बाल न्यायालयाने वाहतुकीचे नियम गिरवण्याची शिक्षा दिली. 

न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतूक नियंत्रण शाखेने जगन्नाथला वाहतूक नियमांचे धडे दिलेत.. वाहतुकीच्या प्रत्येक नियमाची ट्रॅफिक पोलिसांनी जगन्नाथला खडानखडा माहिती दिली.

दिवसभर वाहतूक नियमांची माहिती घेतल्यानंतर संध्याकाळी जगन्नाथची सुटका झाली.. या अनोख्या शिक्षेनंतर त्यालाही वाहतूक नियमांचं महत्त्व पटलंय. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याचं आवाहन जगन्नाथने वाहनचालकांना केलंय. 

सळसळत्या तरुणाईचा अतिउत्साह आणि वेगाची झिंग यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचं वारंवार पाहायला मिळतं. याच पार्श्वभूमीवर जगन्नाथप्रमाणे सा-यांनीच वाहतुकीच्या नियमांचे धडे घेऊन त्यांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचं आहे. तरच वाहतूक समस्येवर तोडगा तर निघेलच शिवाय अपघातांची संख्या कमी होण्यासही मदत होईल.