डोंबिवली : फेरीवाला मारहाण प्रकरणी 40 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर 4 शिवसैनिकांना अटक करण्यात आली.
या शिवसैनिकांना अटक झाल्यानंतर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिकांना सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणत होते मात्र कायदा व सुव्यवस्था मोडल्याचं कारण देत पोलिसांनी त्यांना जुमानलं नाही आणि आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले.
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात ठाण्यापाठोपाठ आता डोंबिवलीतही मोहीम उघडली. मात्र ही मोहीम महापालिकेच्या अधिका-यांनी नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेनंच उघडली आहे. शिवसैनिकांनी डोंबिवलीतल्या फेरीवाल्यांना मारहाण केली आहे. या फेरीवाल्यांच्या साहित्याची तोडफोडही करण्यात आली. या आंदोलनात युवासेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या.
पुन्हा अनधिकृत फेरीवाले आले तर पुन्हा मारहाण करणार असल्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे. अनधिकृत रिक्षावाल्यांविरोधातही यावेळी आंदोलन छेडण्यात आलं. पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनंच राडा केल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.