इंग्रजी शाळा म्हणजे 'खाटीक खाना' : डॉ. भालचंद्र नेमाडे

नव्या पिढीनेच 'जातीची भूतं' आणली, तसेच इंग्रजी शाळांसारख्या 'खाटीक खान्या'त पुढच्या पिढीने तरी त्यांच्या मुलांना पाठवू नये, कारण शिक्षणाचा उकिरडा झाला आहे,'  असं परखड मत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडलं आहे. 

Updated: Jun 15, 2015, 02:13 PM IST
इंग्रजी शाळा म्हणजे 'खाटीक खाना' : डॉ. भालचंद्र नेमाडे title=

पुणे : नव्या पिढीनेच 'जातीची भूतं' आणली, तसेच इंग्रजी शाळांसारख्या 'खाटीक खान्या'त पुढच्या पिढीने तरी त्यांच्या मुलांना पाठवू नये, कारण शिक्षणाचा उकिरडा झाला आहे,'  असं परखड मत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडलं आहे. 

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना भालचंद्र नेमाडे म्हणाले, ब्राह्मण राष्ट्रवाद कमी करण्यासाठी ‘मराठा राष्ट्रवाद‘ आणला गेला. आरक्षणासाठी १९०१ पूर्वी ‘मराठा‘ अशी परिस्थिती नव्हती. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज स्वतःला ‘मराठा‘ म्हणत नव्हते. पण नव्या पिढीने ‘जातीची भूतं‘ आणली. धर्मांचा उन्माद झाल्याने देश फुटला, अशा परिस्थितीतूनच समाजात चिंताग्रस्तता निर्माण झाली.

गौतम बुद्ध, महात्मा फुले यांनाही जातीव्यवस्था मोडता आली नाही

नेमाडे म्हणाले, 'जातिसंस्था गौतम बुद्ध, महात्मा फुले यांना देखील मोडता आली नाही. हे भान लोकांना नाही. परंतु, जात-धर्मावर उथळ विचार होतो. इंग्लंड, अमेरिकेतही धर्मांबाबत उथळ विचार आहे. जातिव्यवस्थेमुळे देश फुटला नसून टिकून आहे. 

बौद्धिक परंपरेतील माणसे निर्माण झाली नाहीत
बौद्धिकता आणि साहित्यातील लेखनात अंतर पडले आहे. त्यामुळे महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्धिक परंपरेतील माणसे अलीकडच्या काळात झालेली नाहीत. ज्ञानेश्‍वरीच्या अगोदरपासून मराठी भाषेत मोठे ग्रंथ होते, त्याचे आणि हिंदू परंपरा केव्हापासून सुरू होती, याचे भान आपल्याला नाही.‘‘ 

साठ हजार वर्षांपासून मराठीला इतिहास
'साठ हजार वर्षांपासून मराठीला इतिहास आहे. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत शुद्ध मराठी बोलली जात होती. विचार सर्वांपर्यंत पोचतात तेव्हा ते साहित्याचे लक्षण असल्याचे म्हटले जाते. पण आज शब्दही नीटसे वापरत नाहीत. भाषेचे ज्ञान नसते. त्यामुळेच आत्ताच्या नाटक, कवितेत उत्तुंग बौद्धिक परंपरा दिसत नाही. 
शुद्ध-अशुद्धतेची अडगळ साहित्यात शिरली आहे. म्हणूनच खालच्या रांगेतले वाङ्‌मय प्रकार आले आहेत. इंग्रजीचे स्तोम विशेषतः मराठी लोकांनीच वाढविले. त्यापेक्षा मातृभाषा कामी येते. पण पालकच मूर्ख झाले आहेत. इंग्रजी शाळांसारख्या "खाटीक खान्या‘त पुढच्या पिढीने तरी त्यांच्या मुलांना पाठवू नये, कारण शिक्षणाचा उकिरडा झाला आहे,' असेही त्यांनी सांगितले. 

एसपी कॉलेजने रविवारी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भालचंद्र नेमाडे बोलते होते. 'शंभर वर्षांतला मराठी समाज आणि मराठी साहित्यातले संदर्भ' या विषयावर त्यांनी विचार मांडले. 

शिक्षण प्रसारक मंडळींच्या नियामक मंडळाचे सदस्य ऍड. जयंत शाळिग्राम, प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, डॉ. गोरख थोरात उपस्थित होते. या वेळी नेमाडे यांच्या हस्ते 'परशुरामीय‘ या नियतकालिकाचे प्रकाशन झाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.