पुणे : पुणेकरांसाठी बातमी आनंदाची पण जबाबदारीचीही आहे, पुणे शहराला पुरेसा पाणीपुरवठा हईल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे, मात्र तो आणखी जास्त दिवस पुरेल यासाठी पाणी वाचवण्याची जबाबदारी देखील प्रत्येक पुणेकराला घ्यावी लागणार आहे.
पुणे शहराला १६ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक असल्यानं यावर्षी तूर्तास पाणीकपात न करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मागील वर्षी झालेला पुरेसा पाऊस तसेच उपलब्ध पाण्याच्या योग्य नियोजनामुळे आजघडीला धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे.
पानशेत, वरसगाव, टेमघर तसेच खडकवासला धरणात मिळून ३५ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील साडेतीन टीएमसी पाणी ग्रामीण भागाला देऊनही शहरात पाणीकपात करण्याची वेळ येणार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांत पुण्यामध्ये नेमानं पाणीकपात करावी लागली होती. यावर्षी मात्र त्यातून मुक्तता झाल्यानं पुणेकर सुखावले आहेत.