अपहरण झालेली चिमुकली सापडली मात्र तिचे हाल हाल केले

अकोट येथून अपहरण करण्यात आलेली मनश्री लकडे ही पाच वर्षीय चिमुकली काल शेगाव येथे रेल्वे स्थानकावर सापडलीय. तब्बल 67 दिवस ती अपहरणकर्त्यांच्या तावडीत होती. मात्र, अंगावर काटा उभा राहिले असे तिचे हाल करण्यात आले.

Updated: Sep 3, 2016, 08:53 AM IST
अपहरण झालेली चिमुकली सापडली मात्र तिचे हाल हाल केले title=

अकोला : जिल्ह्यातील अकोट येथून अपहरण करण्यात आलेली मनश्री लकडे ही पाच वर्षीय चिमुकली काल शेगाव येथे रेल्वे स्थानकावर सापडलीय. तब्बल 67 दिवस ती अपहरणकर्त्यांच्या तावडीत होती. मात्र, अंगावर काटा उभा राहिले असे तिचे हाल करण्यात आले.

अकोला जिल्ह्यातल्या अकोटचे संतोष लकडे. त्यांच्या घरात 24 जूनपासून या घराला आनंद काय हे माहितच नव्हतं. कारण, या घरानं मागच्या दोन-अडीच महिन्यात पाहिलेत ते फक्त अश्रू. मुलीच्या परतण्याची आस अन् पराकोटीची आतुरता. मात्र, या घरातील आजचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा. आजही या कुटुंबीयांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. मात्र, ते आनंदाश्रू आहेत. कारण, अपहरण झालेली या सर्वांची लाडकी मनश्री तब्बल 67 दिवसांनी घरी आली. 

संतोष हे बांधकाम मजूर तर आई छाया हे लोकांकडे स्वयंपाकाचं काम करतात. 24 जून रोजी संतोष यांच्या पाच वर्षीय मनश्रीचं एका अज्ञात महिलेने घरासमोरच्या मैदानातून खेळतांना अपहरण केलं होतं. आता मनश्री सापडली असली तरी तिच्या अंगावर असलेले चटक्यांचे व्रण मारहाणीत पडलेला दात अपहरणकर्त्यांची राक्षसीपणाची साक्ष देणारा आहे.

गुरुवारी आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या मनश्रीला पाहिल्यानंतर लकडे कुटुंबीयांचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा होता. मनश्रीच्या शोधासाठी अकोट पोलिसांनी जंग-जंग पछाडले. अकोट पोलिसांची पथके राज्यातील महत्वाच्या शहरांसह खांडवा, हैद्राबाद, राजस्थान येथूनही जाऊन आलीय. गुरुवारी अखेर मनश्री शेगाव येथील रेल्वेस्थानकावर आढळून आलीय. ती तिथे कशी आलीय?, कुणी आणून सोडलेय?, याची उत्तरे पोलिसांना अद्याप मिळालेली नाहीत.

अनेक ठिकाणी लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना घडत असतात. अशा घटनांतील प्रवृत्ती संपविण्यासाठी कायदा आणखी कठोरपणे राबविण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.