कॉपी करताना पकडल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या

कॉपी करताना पकडल्यामुळे कल्याणमधल्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे.

Updated: Sep 2, 2016, 10:55 PM IST
कॉपी करताना पकडल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या  title=

कल्याण : कॉपी करताना पकडल्यामुळे कल्याणमधल्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. सार्थक पोहेकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. सार्थक हा नववीमध्ये शिकत होता. शिक्षकानं सार्थकला कॉपी करताना पकडलं आणि चोप दिला होता. दुसऱ्या दिवशी आई कामावर गेल्यावर सार्थकनं गळफास लावून आत्महत्या केली. 

कॉपी करताना पकडल्यानंतर शिक्षकानं त्याला बेदम मारहाण केली. हा प्रकार त्यानं घरी सांगितला. या प्रकाराचा सार्थकनं मानसिक धसका घेतला होता. शाळेत जायला सांगूनही तो शाळेत गेला नाही, असा दावा सार्थकच्या आईनं केला आहे. 

आत्महत्येपूर्वी सार्थकनं चिठ्ठी लिहीली होती. बदनामीच्या भीतीमुळे मी आत्महत्या करत आहे. लहान भाऊ स्मितला शिकवून मोठा करा. घरी गणपत्ती बाप्पा बसवा, असं सार्थकनं या चिठ्ठीमध्ये लिहीलं आहे. 

सार्थकच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शिक्षक दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.