जीएसटीच्या घटना दुरुस्तीला विधीमंडळात मंजुरी

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या विधेयकाला राज्याच्या विधानसभेतही मंजुरी देण्यात आली आहे.

Updated: Aug 29, 2016, 10:14 PM IST
जीएसटीच्या घटना दुरुस्तीला विधीमंडळात मंजुरी  title=

मुंबई : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या विधेयकाला राज्याच्या विधानसभेतही मंजुरी देण्यात आली आहे. सर्वपक्षांनी एकमतानं जीएसटीला मंजुरी दिली. नव्या करप्रणालीमुळे देशासोबतच राज्याचंही भलं होणार असल्याचा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 

मुंबई जकातमुक्त होणार आहे, तेव्हा मुंबईला कराचा भरीव वाटा मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच जीएसटीवरून भाजप आणि शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला. 

तर युपीएच्या काळात जीएसटीला भाजपनं विरोध केला नसता तर पाच वर्षांपूर्वीच जीएसटी लागू झाला असता असा प्रतिटोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. जीएसटीमुळं शिवसेनेची अडचण होणार असून भाजपवर विसंबून राहावं लागणार असल्याचा मिश्किल टोला अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेला लगावला.