प्लॅन्चेट प्रकरण : 'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट'

प्लँचेट प्रकरणी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना क्लिनचीट मिळालीय. सरकारच्या चौकशी अहवालात पोळ यांना ही क्लिनचीट देण्यात आलीय. 

Updated: Feb 25, 2015, 10:01 PM IST
प्लॅन्चेट प्रकरण : 'गुलाबराव पोळ यांना क्लीनचीट' title=

पुणे : प्लँचेट प्रकरणी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना क्लिनचीट मिळालीय. सरकारच्या चौकशी अहवालात पोळ यांना ही क्लिनचीट देण्यात आलीय. त्यामुळे, दाभोलकर हत्या प्रकरणासंबंधी प्लँचेट प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय. गुलाबराव पोळ यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा धुडकावून लावलाय. प्लँचेट आणि बदली यांचा काहीही संबंध नाही, असा दावा गुलाबराव पोळ यांच्या वकिलानं केलाय.

दीड वर्षं उलटली तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही. त्यातच, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी चक्क प्लँचेटची मदत घेतली होती... आणि अशा भंपक मार्गाचा वापर केल्यानंच त्यांची बदली करण्यात आली अशी खळबळजनक कबुली माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. 

पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मनीष ठाकूर नावाच्या मांत्रिकाच्या माध्यमातून प्लँचेट केल्याचं एका स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आलं होतं. त्यामुळं आता तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आणि मांत्रिक मनीष ठाकूर यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी नरेंद्र दाभोलकरांचा मुलगा हमीद दाभोलकर यांनी केलीय. 

गुलाबराव पोळ यांनी प्लँचेट केल्याच्या आरोपांचा इन्कार केला होता. एवढंच नव्हे तर स्टिंग ऑपरेशन करणा-यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला होता. मात्र अजित पवारांनी त्यातली हवाच काढून घेतलीय... या पार्श्वभूमीवर गुलाबराव पोळ आणि मांत्रिक मनीष ठाकूर यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी हमीद दाभोलकर यांनी केलीय. 

अंधश्रद्धेच्या विरोधात नरेंद्र दाभोलकरांनी आपलं आयुष्य वेचलं... मात्र, त्यांच्या मारेकऱ्यांना  शोधण्यासाठी पोलिसांनी अंधश्रद्धेचाच आधार घ्यावा, हा म्हणजे त्यांची दुसऱ्यांदा हत्या करण्याचाच प्रकार आहे. सरकार बदललं तरी अजून मारेकरी सापडलेले नाहीत. आता निदान अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर तरी सरकार कारवाई करणार की नाही?
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.