मुंबई : मुंबईकरांचा आजचा दिवस घामेघूम राहण्याची शक्यता आहे. हवेत वाढलेली आर्द्रता आणि ढगांचं आच्छादन यामुळे कोंडली गेलेली हवा यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्यात.
मुंबईत पहाटेपासूनच हवेत उष्मा जाणवू लागलाय. मुंबईतल्या कुलाबा वेधशाळेत ३५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. तर काल हवेतली आर्द्रता तब्बल ८३ टक्के होती. सांताक्रूझ वेधशाळेमध्येही ७२ टक्के आर्द्रतेची नोंद झालीय.
मुंबईखेरीज कोकण आणि गोव्यातही हवेतली आर्द्रता वाढलीय. आज किंवा उद्यापर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या धारा बरसून या वाढलेल्या उकाड्यातून थोडा दिलासा मिळतो का, या प्रतिक्षेत मुंबईकर आहेत.
तर विदर्भातही तापमापकाचा पारा तापलाय... आठ दिवस वादळी आणि कमी तापमानाचे दिवस अनुभवल्यानंतर चंद्रपूरात सुर्यनारायण आग ओकू लागलाय. चंद्रपूर आणी परिसरात उष्णतेची लाट कायम आहे. चंद्रपूरचं तापमान सातत्यानं ४६ अंशापर्यंत उसळी मारत असल्यानं नागरिक हैराण आहेत. गेले दोन दिवस तर चंद्रपूर देशातील सर्वाधिक तापमानाच्या शहरांपैकी एक ठरलंय. आधीच पाणीटंचाई आणि त्यात तापमानाचा तडाखा यामुळे नागरिक धास्तावलेत.