महापालिका निवडणूक: शिवसेना औरंगाबादचं नाव बदलणार?

औरंगाबादमध्ये लवकरच महापालिका निवडणुका होणार आहे. त्यादृष्टीनं सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेनेंनंही त्यांचा जुना मुद्दा म्हणजे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा पुन्हा वर काढला आहे. मात्र खरचं एखाद्या शहराचं नाव बदलणं म्हणजेच अस्मिता असते का? इतिहासाचा यासोबत काय संबध असतो अशा अनेक गोष्टी यानिमित्तानं पुढं येतायेत. 

Updated: Mar 23, 2015, 10:57 PM IST
महापालिका निवडणूक: शिवसेना औरंगाबादचं नाव बदलणार? title=

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये लवकरच महापालिका निवडणुका होणार आहे. त्यादृष्टीनं सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेनेंनंही त्यांचा जुना मुद्दा म्हणजे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा पुन्हा वर काढला आहे. मात्र खरचं एखाद्या शहराचं नाव बदलणं म्हणजेच अस्मिता असते का? इतिहासाचा यासोबत काय संबध असतो अशा अनेक गोष्टी यानिमित्तानं पुढं येतायेत. 

औरंगाबाद... एक पुरातन आणि ऐतिहासिक शहर... इतिहासाचं वरदान असलेलं शहर... शहरात सगळीकडेच इतिहासाच्या पाऊलखुणा दिसून येतात. बिवी का मकबरा, पानचक्की, शहरातले ऐतिहासिक दरवाजे, नहर-ए-अंबरी अशा एक ना अनेक वास्तू या शहरात आहेत.  याच ऐतिहासिक औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर ठेवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

खरं तर आताच्या या औरंगाबादचा इतिहास अगदी पुरातन काळात जातो. मुंबईच्या कान्हेरी गुफांमध्ये एक शिलालेख सापडला होता. त्यात औरंगाबादचं नाव राजतडक असल्याचं आढळून आलंय. हे नाव कुणी ठेवलं. त्या नावाचा वास्तवाशी काय संबंध आहे का? यावर अजूनही प्रकाश पडलेला नाही... त्यानंतर या शहराचं दुसरं नावाजलेलं नाव म्हणजे खडकी. हा परिसर बेसाल्ट खडकावर वसलेला आहे. शहरात अगदी प्राचीन असं महादेवाचं मंदिर आहे. त्याचं नाव आहे खडकेश्वर...याच नावावरून या शहराचं नाव खडकी पडलं असावं अशी इतिहासात नोंद आहे. 

त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता. खऱ्याा अर्थानं नहरे ए अंबरीसारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्यानं या गावाचं शहर केलं. मात्र त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही... कालांतरानं १६३३ मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचं नाव फतेहनगर असं केलं. १६५३मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्यानं पुन्हा या शहराचं नाव फतेहनगर वरून खुजिस्ता बुनियाद असं ठेवलं, कालांतरानं हे नाव सुद्धा बदलण्यात आलं आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिलं.

काळाच्या ओघात औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी झाली. अजिंठा आणि ऐलोरा सारख्या वास्तूंमुळं अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात औरंगाबादचं नाव दुमदुमलं. मात्र हेच नाव आता बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या... नाव बदलण्यामागं राजकारण हे एकमेव कारण असल्याचं इतिहास तज्ज्ञ सांगतात अगदी प्राचिन काळापासून हा ट्रेन्ड सुरु असल्याचे दाखले ते देतात.

आतापर्यंत शहारराच्या नावामागं शहराशी निगडीत सखोल अभ्यास असायचा संभाजीनगर नावामागंही काही इतिहास आहे का? हे सुद्धा शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.. त्यात सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह आहेत

कदाचित संभाजी महारांच्या इतिहासाच्या प्रेमापोटी आता या शहरचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे, अथवा निवडणूका समोर आल्या म्हणून पुन्हा जुना मुद्दा नवीन करण्याचा प्रयत्न आहे हे शिवसेनेला माहित... मात्र वरवर तरी औरंगजेबाचं नाव या शहराला नको अशीच भूमिका शिवसेना मांडतेय.

संभाजी महाराजांचा वध औरंगजेबानं केलाय, त्यामुळं कदाचित त्या औरंगजेबाचं नाव या शहराला नको असं शिवसेनेला वाटत असावं, काळ बदलला मात्र अजूनही सत्ता बदलली की आपल्या पद्धतीनं नाव बदल्याचा प्रयत्न त्या त्या काळातील राजा करतो हेच यामागील सत्य म्हणावे लागेल. उद्या कदाचित शिवसेना भाजपची सत्ता बदल्यावर येणाऱ्या नव्या  राजानं पुन्हा आपल्या सोयीनं या शहराचं नाव बदललं तर आश्चर्य वाटायला नको.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.