जालना : यावर्षी जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलाय. आधीच घरातल्या कर्त्या माणसाचं छत्र हरवल्यानं ही कुटुंब आज उघडयावर आलीत.
शेतकऱ्यांना प्रशासन आणि सरकारकडून मिळणारी मदत न मिळाल्यानं या कुटुंबाची हेळसांड सुरु झाली आहे. जाफराबाद तालुक्यातील डोणगावच्या विलास राऊत या तरुण शेतक-यानं आत्महत्या केली. दुष्काळी परिस्थिती आणि नापिकीपणामुळे आपण आत्महत्या केल्याच त्यानं चिट्ठीत लिहून ठेवलं आणि दुष्काळाच भयाण वास्तव समोर आले.
एक एकर जमीनीवर विलासनं कपाशीची लागवड केली होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे उभं पीक करपून गेलं.. लागवडीसाठी घेतलेलं बँकेच कर्ज आता फेडायचं कस या चिंतेपायी विलासन चिंचेच्या झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली. कुटुंब उघड्यावर पडलं मात्र सरकारची मदत अजूनही मिळालीच नाही.
अंबड तालुक्यातील्या कर्जत गावच्या कुंडलिक बनसोडेनं आत्महत्या करून आता दोन वर्ष उलटलीत. घरातला कर्ता माणूस गेल्यानं अवघा संसार कोलमडून पडला. लोकप्रतिनिधी आले सहानुभूती दाखवली मात्र मदतीची एक कवडीही मिळाली नाही.
दुष्काळ आणि निसर्गाचा बे भरवसा यामुळे राब-राब राबणारा शेतकरी आता हतबल झालाय.शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी यंत्रणा भ्रष्ट झाली..आणि सत्ताधारीही फक्त आवाजी घोषणा करू लागले.पण या दोन्हीही तिढ्यात शेतकरी भरडल्या गेल्यानं आत्महत्येचा आकडा वाढला.
दहा महिन्यांपूर्वी सतत वाढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकड्यावर आताचे सत्ताधारी विधानसभेच्या सभागृहात धिंगाणा घालत होते. आता तेच विरोधक सत्ताधारी झालेत. पण शेतकरी आत्महत्येचा वाढता आकडा काही कमी होत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.