एक लाख रुपये दिले नाही म्हणून जातपंचायतीनं कुटुंबाला वाळीत टाकलं

नाशिकमधील काशिकापडी समाजाचं जात पंचायात प्रकरण ताजं असतानाच नांदेडमध्ये जात पंचायतीचा आणखी एक प्रकार समोर आलाय. वैदू समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचं समोर येतंय. इतकंच नाही तर, पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या कुटुंबाने न्यायालयाकडे धाव घेतलीय. 

Updated: Jan 6, 2016, 10:15 AM IST
एक लाख रुपये दिले नाही म्हणून जातपंचायतीनं कुटुंबाला वाळीत टाकलं title=

सतीश मोहिते, नांदेड : नाशिकमधील काशिकापडी समाजाचं जात पंचायात प्रकरण ताजं असतानाच नांदेडमध्ये जात पंचायतीचा आणखी एक प्रकार समोर आलाय. वैदू समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचं समोर येतंय. इतकंच नाही तर, पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या कुटुंबाने न्यायालयाकडे धाव घेतलीय. 

पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जात पंचायतीसारखे प्रकार अजूनही अस्तित्वात असल्याच्या घटना वारंवार उजेडात येत आहेत.  नाशिकमध्ये काशिकापडी जात पंचायतीचा अघोरी प्रकार समोर आल्यानंतर नांदेडमध्ये जात पंचायतीची घटना समोर आलीय. वैदू समाजाने एका कुटुंबाला वाळीत टाकलंय. 

पैसे दिले नाही म्हणून... 
मुळचे हिंगोली जिल्ह्यातील खांबाळा येथील रहिवाशी केशव शांकट यांनी आपल्याच समाजातील रामा वाडपल्लु यांच्याकडून अर्धापूर येथील एका प्लॉटचा सौद केला होता. ईसार पावती करुन त्यांनी वाडपल्लु यांना ३ लाख ७५ हजार रुपये अदाही केले. पण उर्वरित रक्कम घेऊन रजिस्ट्री करुन देण्यासाठी वाडपल्लु टाळाटाळ करु लागले. वाडपल्लु यांनी वैदू समाजातील जात पंचांना हाताशी धरून हे प्रकरण सोडवण्याची विनंती केली. वाद मिटवण्याकरता पंचांनी दोन ते तीन वेळा केशव शांकट यांच्याकडेच एक लाख रुपयांची मागणी केली.

पण, पदवीधर असलेल्या शांकट यांनी जात पंचायतीला पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा नांदेड जिल्ह्यातील तामसा जवळ ४ नोव्हेंबर २०१५ रोजी वैदू समाजातील पंचांनी बैठक घेतली आणि शांकट यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आल्याचा फतवा काढण्यात आला. शांकट यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलंय.

लग्नातून अपमान करून बाहरे काढलं... 
एका लग्नाला वाशिम तालुक्यातील कोंढाळा येथे शांकट कुटुंबीय गेले असता त्यांना तिथून हाकलून बाहेर काढण्यात आलं. जात-पंचायतीचे पंच रमेश अंभोरे यांनी तेथील लोकांना फोन करुन 'यांना जातीतून वाळीत टाकले आहे त्यांना बाहेर काढा' असा संदेश दिला. त्यामुळे, लग्नाला उपस्थित असलेल्या पचांनी अपमानास्पद वागणूक देऊन केशव, त्यांचे वडील ग्यानु आणि आई राधाबाई यांना लग्नातून बाहेर हाकलले.

पोलिसांची टाळाटाळ...
शांकट कुटुंबीयांनी न्यायासाठी अर्धापूर पोलिसांत धाव घेतली. पण पोलीसांनी काहीच कारवाई केली नाही. पुण्यातील 'बॉर्न टू हेल्प चॅरेटेबल ट्रस्ट'नं या कुटुंबाला मदत केली. त्यामुळे शांकट यांनी अर्धापूर न्यायालयात जात पंचायतीविरोधात धाव घेतलीयं. जात पंचायतीसारखे प्रकार अजूनही महाराष्ट्रात सुरू असून शासनाने कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश द्यावेत, अशी मागणी 'बॉर्न टू हेल्प'चे सदस्य डॉ. चंदन लोखंडे यांनी केलीय.

जात पंचायतीचे एक-एक प्रकार समोर येत आहेत. कारण नव-सुशिक्षित मुलं याला वाचा फोडत आहेत. सरकारनंही आता जात-पंचायतीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कडक धोरण राबवणं गरजेचं आहे.