योगेश खरे, नाशिक : नाशिकमधल्या आडवाटेवरच्या कष्टकरी कुटुंबातल्या नितीन आहेर यानं दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले आहेत. आदिवासी आश्रमशाळेत शिकलेल्या नितीनला डॉक्टर व्हायचं आहे. महत्त्वाकांक्षी नितीनला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीच्या हातांची गरज आहे.
दहावीत ९१ पॉईंट ८० टक्के गुण मिळवणारा हा नितीन आहेर, नाशिकपासून साठ किलोमिटर अंतरावरच्या त्र्यंबक तालुक्यात, आडवाटेवरच्या धुमोडी गावात राहतो. आई वडील रानावनातून मिळेल ते आणतात आणि त्र्यंबकेश्वरला येऊन विकतात. त्यातून त्यांना महिन्याला कसेबसे तीन हजार रुपये मिळतात. रानातून करवंद गोळा करुन ती विकण्याच्या कामात, नितीनही घरच्यांना मदत करतो.
वडील पांडुरंग आहेर आणि आई रखमाबाई यांना आपल्या मुलाचा यामुळेच मोठा अभिमान वाटतोय. उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या नितीनला डॉक्टर होऊन गरीब, मागास गावकऱ्यांची सेवा करण्याची इच्छा आहे.
हुशार नितीनमध्ये प्रचंड जिद्द आहे, मेहनत करण्याची इच्छाही आहे. हुशारीच्या बळावर भरारी घेण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्याला संवेदनशील समाजाच्या उदार हातांची गरज आहे.