कोल्हापूर : बेळगावजवळच्या येळ्ळूर प्रकरणाचे पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत. येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य लिहिलेला फलक काढून टाकल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी कोल्हापुरात कर्नाटकच्या बसेसची तोडफोड केलीय.
शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ही तोडफोड केली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येळ्ळूर गावच्या पंचायतीवरचा भगवा झेंडा काढण्य़ात आला, मात्र कर्नाटकचे पिवळे झेंडे काढण्यात आले नव्हते. तसंच येळ्ळूरच्या सीमेवर असणारा महाराष्ट्राचा बोर्डही प्रशासनाने निकाल येण्याआधीच तोडलाय. त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटले.
कर्नाटक सरकारची दडपशाही
कर्नाटक सरकार सीमावासिय मराठी भाषकांची गळचेपी करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला.सीमाभागातल्या गावांत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आणि महाराष्ट्र द्वेशाचं नवं रूप नुकतंच पाहायला मिळालं.
येळ्ळूर गावाच्या सीमेवर 1956 सालापासून असलेला महाराष्ट्र राज्य हा बोर्ड उच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच कर्नाटकने तोडलाय. 27 तारखेला याबाबत निकाल येणं अपेक्षित होतं. गावाच्या पंचायतीवर असलेल्या भगवा झेंडा काढण्याचे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र बोर्डाबाबत निकाल येण्याआधीच कर्नाटकच्या अधिका-यांनी हा बोर्डही तोडलाय.
विशेष म्हणजे सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वजाव्यतिरिक्त कोणताही झेंडा नको असा आदेश उच्च न्यायालयाने दिला असताना भगवा ध्वज काढणा-या प्रशासनाने कर्नाटकाचे पिवळे ध्वज मात्र कायम ठेवलेत. भगवे ध्वज आणि महाराष्ट्राचा बोर्ड याविरोधात मोहन ग़डद यांनी याचिका केली होती. याबाबत आता महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.