कल्याण डोंबिवली-कोल्हापूरला १ नोव्हेबरला मतदान

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले आहेत. दोन्ही महापालिकांसाठी रविवारी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

Updated: Sep 28, 2015, 05:59 PM IST
कल्याण डोंबिवली-कोल्हापूरला १ नोव्हेबरला मतदान  title=

मुंबई : कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले आहेत. दोन्ही महापालिकांसाठी रविवारी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

 कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिका, नवनिर्मित ३ नगरपरिषदा व ६४ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर २०१५ रोजी मतदान होणार आहे.
 
राज्यभरातील एकूण २ हजार ३५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २८ ऑक्टोबर २०१५ ; तसेच १ व ६ नोव्हेंबर २०१५ अशा तीन टप्प्यात मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत केली.
 
कोल्हापूर महापालिकेची मुदत १४ नोव्हेंबरला तर कडोंमपाची मुदत ११ नोव्हेंबरला संपत आहे. निवडणुका २७ गावांच्या समावेशासह होणार आहेत.
 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी ६१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी ४१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. दोन्ही ठिकाणी २ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल.
 
निवडणूक होत असलेल्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी मतदानाची वेळ असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.