लातूर : भारताचा 70 वा स्वातंत्र्यदिन सोमवारी थाटात साजरा झाला. हजारो शाळकरी मुलंमुली ध्वजवंदनासाठी सकाळी शाळेत पोहोचली पण सरोजिनी नावाची ही 10 वर्षांची मुलगी त्याला अपवाद होती.
लातूरच्या शिवाजी चौकात सकाळी सकाळी दोरीवर जीवघेण्या कसरती करत ती उपस्थितांचं मनोरंजन करत होती. तिला ना स्वातंत्र्याचा अर्थ माहित होता, ना शिक्षणाचा गंध. छत्तीसगढच्या बिलासपूर जिल्ह्यातील ही चिमुरडी कधी शाळेत गेलीच नाही. तिच्या वडिलांनी तिला शाळेत पाठवण्याऐवजी दोरीवरच्या कसरची शिकवल्या. कारण पोटाची खळगी भरायची असेल तर शिक्षणासाठी पाठवून कसे चालेल.
दोरीच्या दोन्ही बाजूला तिरंगा झेंडा लावून स्वातंत्र्यदिनी हा खेळ रंगला होता. विविध प्रकारच्या कसरती सरोजिनी करत होती. महिला सैनिक सीमेवर देशाचं रक्षण करतात, आकाशात भरारी घेतात. मात्र सरोजिनी सारख्या कित्येक मुलींना स्वातंत्र्याचा साधा अर्थही माहित नाही.
पोटाची खळगी भरण्यासाठी आपला जीव मुठीत धरून त्या दोरीवरच्या खेळात गुंग आहेत. त्यांच्यापर्यंत कधी पोहचणार स्वातंत्र्य? कधी होणार त्यांच्या शिक्षणाची सोय? प्रश्न अवघड आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे लोटली मात्र अद्यापही बालमजुरीतून लहाग्यांची सुटका झालीय का? या प्रश्नाचे अजूनही नाहीच असेल तर कुठेय स्वातंत्र्य.