नागपूर : विधानपरिषदेतल्या गदारोळावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. तालिका सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी धमकी दिली. गदारोळातच विधानपरिषद कामकाज अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत तहकूब करण्यात आले.
विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलत असताना विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे तालिका सभापती नरेंद्र पाटील यांनी कामकाज तहकूब केल्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र यावर संसंदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी जोरदार आक्षेप घेतला. तसंच तालिका सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा इशारा दिला.
कामकाज मंत्री म्हणून बोलू दिले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. असे झाले तर वेगळा विचार करावा लागेल, अविश्वास ठराव आणावा लागेल अशी धमकीचं गिरीश बापटांनी दिली. बापट यांनी दिलेला इशारा योग्य नाही. बापट यांना अशी भाषा शोभत नसल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
दरम्यान, आज विधान परिषदेच्या कामकाजात अभूतपूर्व गोंधळ बघयाला मिळालाय. सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यावर पुन्हा एकदा सुरू करावं लागलं. विरोधकांच्या गोंधळ दरम्यान सभापतींनी विधानपरिषदेचं कामकाज मार्च महिन्यापर्यंत तहकूब केलं.
पण कामकाज राष्ट्रगीतानं संपावं अशी सभागृहाचा नियम आहे. त्यामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी पुन्हा बेल वाजवून सभागृह बोलवलं. त्यानंतर राज्यपालांच्या आदेशाचं वाचन झाल्यावर राष्ट्रगीत घेऊन पुन्हा एकदा कामकाज तहकूब करण्यात आले.