महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून कोयना, महाबळेश्वर, तापोळा भागात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात महाबळेश्वर आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात 400 मिमि पावसाची नोंद झाली आहे. कृष्णाआणि कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने महाबळेश्वर तापोळा, कोयना भागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव ओसंडून वाहतोय.
गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर मधील लिंग मळा धबधबा ओसंडून वाहत आहेत. पुढच्या 48 तासात सुद्धा या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा, कराड ,पाटण, कोरेगाव, वाई , फलटण या तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे.