मुलांपेक्षा सरकार करतंय गुरांवर जास्त खर्च

मुंबई : अनाथ आश्रमातील मुलांच्या देखभालीपेक्षा राज्यातील गुरांच्या चाऱ्यावर महाराष्ट्र सरकार जास्त खर्च करते, अशी माहिती समोर आली आहे. 

Updated: Mar 22, 2016, 01:40 PM IST
मुलांपेक्षा सरकार करतंय गुरांवर जास्त खर्च title=

मुंबई : अनाथ आश्रमातील मुलांच्या देखभालीपेक्षा राज्यातील गुरांच्या चाऱ्यावर महाराष्ट्र सरकार जास्त खर्च करते, अशी माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे मोर्शी मतदार संघाचे आमदार अनिल बोर्डे यांनी ही माहिती समोर आणली आहे.

'द एशियन एज' या वृत्तपत्राशी बोलताना बोर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार दर दिवशी अनाथ आश्रमातील प्रत्येक मुलावर ३० रुपये खर्च करते तर राज्यातील गुरांवर ७० रुपये इतका खर्च करते. म्हणजेच मुलांवर दर महिन्याला होणारा ९०० रुपयांचा खर्च १,५०० इतका करावा, अशी मागणी बोर्डे यांनी केली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने मागणी केलेले १५६ कोटी राज्याच्या अर्थ खात्याने अद्याप मंजूर केलेले नाहीत. बोर्डे यांनी राज्य सरकारतर्फे अनाथाश्रमांना दिले जाणारे अनुदान वाढवून देण्याची मागणी केली आहे.

पण, 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सेवाभावी संस्था या धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित येत असल्याने त्यांनी स्वतःचे पैसे स्वतः उभारावे, अशी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. 'सरकार त्यांना सामाजिक प्रश्नांसाठी पाठिंबा देते पण, त्यांनी सरकारी पैशावर अवलंबून राहू नये,' असंही त्यांनी पुढे म्हटलंय.