मुंबई : 'मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' असं म्हणणाऱ्या महाराष्ट्र सरकारमधील महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे सध्या वादात अडकल्यात.
२०६ करोड रुपयांच्या घोटाळ्यात पंकजा मुंडे यांचं नाव आलंय. नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत एका कॉन्ट्रॅक्टरला २०६ करोड रुपयांची ऑर्डर पंकजा यांनी दिल्याचा आरोप आहे.
१५ जून रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुश्री गुंड यांनी पंकजा मुंडे यांना पत्र लिहून, आदिवासी विद्यार्थ्यांना वाटण्यात येणाऱ्या शेंगदाणे, चिक्की यांमध्ये खडे-माती आढळल्याचं कळवलं होतं. उल्लेखनीय म्हणजे, खुद्द पंकजा यांनीच चटई, पुस्तकं, वॉटर फिल्टर यांच्यासोबतच चिक्कीच्या खरेदीलाही मंजुरी दिली होती.
नियमांचं उल्लंघन करत कॉन्ट्रॅक्टरला २०६ करोड रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट देण्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर करण्यात आलाय. सरकारी नियमांनुसार, ३ लाख रुपयांच्यावरील खरेदी करायची असल्यास ई-टेन्डरिंग पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट देण्यात यायला हवं. पण हा नियम इथं पायदळी तुडवला गेला.
पंकजा यांनी १३ फेब्रुवारी रोजी अध्यादेशाद्वारे खरेदीचे आदेश दिले होते. पंकजा मुंडे यांच्याद्वारे केवळ एका दिवसात २४ अध्यादेश काढण्यात आले होते. म्हणजे महाराष्ट्रात हा एक नवीन रेकॉर्डच ठरलाय.
महिला व बालकल्याण विभागात कोट्यावधी रुपयांचं टेंडर नियम डावलून देण्यात आलं. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलीय. याविरुद्ध काँग्रेस आता एन्टी करप्शन ब्युरोकडे जाण्याच्या तयारीत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, पंकजा मुंडे या सध्या देशाबाहेर आहेत. शनिवारी त्या भारतात परतणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.