www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांना हटवून प्रशासक नेमलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नफ्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला त्यावेळी आपल्या मित्रपक्षाचा रोष ओढवून घेतला होता. तेव्हा तोट्यात असलेल्या या बँकेनं यंदा ४४१ कोटींचा नफा कमावलाय. बँकेचा यंदाचा निव्वळ नफा आहे तब्बल ३९१ कोटी... परिणामी आठ वर्षांनंतर बँकेनं प्रथमच ७ टक्के लाभांश जाहीर केलाय. यामुळे सरकारला सुमारे ७ कोटींचा लाभांश मिळणार आहे.
वर्षभरात ५४६ कोटींची कर्जवसुली करण्यात बँकेला यश आलंय. साखर कारखान्यांची बरीचशी थकित कर्जही बँकेनं वसुल केली आहेत. प्रशासक नेमल्यामुळे डबघाईला आलेल्या जिल्हा सहकारी बँकांच्या या शिखर बँकेला शिस्त लागली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सहकारी कर्जपुरवठा यंत्रणेतील शिखर (अपेक्स) बँक आहे. तिची स्थापना १९११ साली झाली. त्यावेळी तिचे कार्यक्षेत्र मुंबई इलाख्यापुरते होते. १९५६ च्या राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ सहकारी बँक तिच्यात विलीन झाली व तिचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विस्तारले. शिखर बँक या स्वरुपात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही भारतीय रिझर्व्ह बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यामधील दुवा म्हणून काम करते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.