www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याची कृत्रिम भाव वाढ केली जातेय. गेल्या माहिनाभरापासून कांद्याची आवक स्थिर असताना कांद्याचे भाव तीनशे पटीने वाढले असल्याचा निष्कर्ष केंद्रीय हॉर्टिकल्चर बोर्डाने काढलाय. व्यापारी या भाववाढीत कळीची भूमिका निभावत असल्यानं सर्वसामान्य वेठीला धरला गेल्याचा समोर आलंय.
कांदा सामान्यांच्या डोळ्यातून पाणी आणतोय. मात्र, याबाबत आता एक माहिती समोर आलीय. ‘एनएचआरडीएफसी’ म्हणजेच केंद्रीय बागवानी संशोधन आणि विकास या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार लासलगावात एक जुलैपासून विक्रीला आलेल्या कांद्याची सरासरी सारखीच आहे. एक जुलैपासून ते १२ ऑगस्टपर्यंत नाशिकच्या बाजारपेठांमध्ये येणाऱ्या कांद्याची आवक स्थिर आहे. उत्पादन आणि आवक यात लक्षवेधी फरक नसतानाही दर तीनशे पटीने वाढल्याचा निष्कर्ष या ‘एनएचआरडीएफसी’नं लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमधील आकडेवारीवरुन काढलाय. आजवर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत कांद्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळतं. मात्र, यंदा पहिल्यांदाच जुलै महिन्यात कांद्याचे दर गगनाला भिडलेत. दर वाढवण्यामागे लॉबी काम करत असल्याचं ‘एनएचआरडीएफसी’चे संचालक आर. पी. गुप्ता यांनी म्हटलंय.
आवक कमी होत असल्याचा कांगावा करत व्यापारी फायदा उचलत असल्याचं बोललं जातंय. केंद्र सरकारच्या पणन विभागाला आणि कृषी विभागाला याबाबत अहवाल देण्यात आलाय. नाशिकमध्ये कांद्याच्या भाव वाढल्याने दिल्लीत अनेक नेते आणि अधिकारी चिंतेत आहेत.
काही क्विंटल कांद्याला सर्वाधिक भाव देत ९० टक्के कांदा सरासरी कमी भावाने खरेदी केला जातोय. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकाची फसवणूक होतेय. त्यातच निवडणुका तोंडावर असल्याने पवारांनी कांदा निर्यात बंद होणार नाही, अशी भूमिका घेतलीय. एकूणच काय कांद्याच्या भावाचे राजकारण तापत ठेवले तर निवडणुका सोप्या होतात, हे निश्चित असलं तरी सामान्यांच्या डोळ्यात मात्र कांदा पाणी आणतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.