पुणे : पुण्यातील मेपल ग्रुपची पाच लाखातली घर योजना ही सरकारी योजना नाही तसंच या योजनेसंदर्भातलं बुकींग बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आलेत.
ज्या नागरिकांनी यात पैसे भरलेत त्यांना ते पैसे परत करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आलेत. तसंच कंपनीच्या सर्व जमीन व्यवहारांबाबत कंपनीला नोटिसा देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री गिरीष बापट यांनी 'रोखठोक' या कार्यक्रमात सांगितलं.
दरम्यान, मेपल ग्रुपविरोधात शिवाजी नगर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय.
योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंत्र्यांचे फोटो छापण्यात आले होते. मात्र, सचिन अग्रवाल यांना आपण ओळखतच नाही अशं गिरीष बापट यांनी म्हटलंय.
दरम्यान, फोटो छापण्यामागे भाजपचेच काही नेते असल्याची माहितीही समोर येतेय. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका माजी अध्यक्षाने यात पुढाकार घेतला होता. अशी माहिती उघड झालीय. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचं आश्वासन देखील या नेत्याने दिलं होतं.
फोटो छापण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही असं मेपल ग्रुपचे सचिन अग्रवाल यांनी पुणे पोलीसांच्या क्राईम ब्रान्चला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. मात्र, त्यांनी पुण्यातील भाजपच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून फोटो छापल्याची माहिती पुढं येतेय.