आमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला

शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 11, 2017, 05:19 PM IST
आमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला title=

पुणे : शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 

 प्रभाग क्रमांक २५, म्हणजेच वानवडीमध्ये एका 'माय -लेका'चा प्रचार जोरात आहे. महापौर प्रशांत जगताप तसेच त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप याठिकाणहून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दोघांचा प्रचार एकत्रच सुरु आहे. पदयात्रा तसेच प्रचारफेऱ्याच्या माध्यमातून दोघे मतदारांशी संवाद साधताहेत. रत्नप्रभा जगताप यापूर्वी नगरसेविका राहिलेल्या आहेत. 

तर प्रशांत जगताप हेदेखील विद्यमान नगरसेवक तसेच महापौर आहेत. यावेळी पक्षाची गरज म्हणून या दोघांनाही राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आलीय. केवळ दोघेच नाही तर वानवडी प्रभागातील राष्ट्रवादीचं संपूर्ण पॅनेल निवडून येणार असल्याचा त्यांचा दावा आहे.  

प्रभाग क्रमांक ४१ म्हणजेच कोंढवा-येवलेवाडीमध्ये स्थानिक आमदारांच्या मातोश्री मतदारसंघ पिंजून काढताहेत. अर्थात आमदारांचीदेखील त्यांना साथ आहे. भाजपचे आमदार योगेश टिळेकर विद्यमान नगरसेवक आहेत. तर त्यांच्या आई रंजना टिळेकर माजी नगरसेविका आहेत. 

यावेळी योगेश टिळेकर महापालिकेसाठी उमेदवार नसले तरी त्यांच्या आई पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोघांनी आजवर केलेल्या कामाच्या जोरावर मतदार याठिकाणी भाजपचे सगळे उमेदवार निवडून देतील असा विश्वास त्यांना आहे. 

वानवडी असो वा कोंढवा, दोन्ही ठिकाणची निवडणूक रंगतदार होणार आहे. नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी देण्यात आल्याचा मुद्दा नाकारता येत नाही. त्यामुळे महापौर तसेच आमदारांची प्रतिष्ठा आणि त्या जोडीला घराणेशाहीचा आरोप, या पार्शवभूमीवर ही निवडणूक होत आहे. आणि म्हणूनच ती यावेळी लक्षवेधी ठरली आहे.