बदलापूर : मोबाईल फोन चोरी झाल्यानंतर आपण काय करतो..? पोलीस तक्रार नोंदवतो आणि फोन परत मिळण्याची वाट बघत बसतो. किंवा नवा फोन घेऊन मोकळे होतो. पण बदलापूरच्या एका तरूणानं मात्र आयडियाची कल्पना लढवली आणि मोबाईल चोराला रंगेहाथ पकडले.
सुबान कुहारी हा १९ वर्षांचा तरूण आपल्या मित्रांसह बदलापूरच्या शांतीसागर वॉटर पार्कमध्ये मज्जामस्ती करण्यासाठी गेला होता. मात्र त्याठिकाणी लॉकरमध्ये ठेवलेलं सामान कुणीतरी चोरलं. सुबान आणि त्याच्या मित्रांचे मोबाईल फोन, पैशांचे पाकिट, हातातली घड्याळं आणि कपडे असा ऐवज चोरीला गेला.
मात्र टिटवाळा पोलिसांनी त्याची साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही. तेव्हा सुबाननं olx.com या वेबसाइटवर नव्या फोनसाठी सर्च सुरू केला. तेव्हा त्याला त्याचाच चोरीला गेलेला HTC चा मोबाईल फोन ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं आढळलं. दुस-याच दिवशी सुबाननं साइटवरील मोबाईलवर संपर्क केला आणि आपणाला मोबाईल विकत घ्यायचाय, असं सांगितलं.
साइटवरचा तो मोबाईल नंबर मितीश चौरसिया नावाच्या तरूणाचा होता. सुबाननं मितीशला कुर्ल्याला मोबाईल विकत घेण्याच्या बहाण्यानं बोलावलं. तिथं वडील आणि चुलत भावाच्या मदतीनं त्यांनी मितीशला रंगेहाथ पकडलं. संतापजनक बाब म्हणजे मोबाईल चोराला तिथं बोलावल्याची माहिती सुबाननं कुर्ला पोलिसांना दिली होती. मात्र पोलीस आरोपींना पकडायला आलेच नाहीत. त्यामुळं मोबाईल चोरांची संपूर्ण टोळी गजाआड होऊ शकली नाही.
सध्या हा मोबाईल चोर मितीश चौरसिया टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो MBA चा विद्यार्थी असून, मौजमजेसाठी चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. एकीकडे १९ वर्षीय तरुणाच्या कल्पकतेमुळे मोबाईल चोर गजाआड झालाय. तर दुसरीकडं मितीशसारखा उच्चशिक्षित तरूण जीवाची मजा करण्यासाठी वाममार्गाला लागल्याचं धक्कादायक वास्तव या घटनेनं पुढं आणलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.