मन सुन्न करणारी बातमी, कोल्हापुरात असाह्य मातेची भवानी मंडपात प्रसुती

मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी बातमी. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात एका गरीब आणि असाह्य महिलेची प्रसुती झाली आहे. २२ तास ही महिला थंडीत कुडकुडत होती. मात्र, कोणीही लक्ष दिले. मीडियाने वृत्त दाखवताच तिला तात्काळ मदत मिळाली.

Updated: Dec 2, 2015, 05:55 PM IST
मन सुन्न करणारी बातमी, कोल्हापुरात असाह्य मातेची भवानी मंडपात प्रसुती  title=

कोल्हापूर : मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी बातमी. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात एका गरीब आणि असाह्य महिलेची प्रसुती झाली आहे. २२ तास ही महिला थंडीत कुडकुडत होती. मात्र, कोणीही लक्ष दिले. मीडियाने वृत्त दाखवताच तिला तात्काळ मदत मिळाली.

प्रसुतीनंतर या महिलेला सरकारी रुग्णालयात हलवलं जाईल, असं तिला वाटत होतं, पण तिच्याकडं लक्ष द्यायाला बिझी जगाला वेळ नव्हता. त्यामुळं प्रसुतीनंतरही थंडीत अनेक तास ती महिला आपल्य नवजात बाळाला घेऊन भवानी मंडपातच बसून राहिली. आज दुपारी वृत्तवाहिन्यांनी ही बातमी दाखवताच त्यानंतर मात्र सगळीच परिस्थिती बदलली.

कोल्हापूरचा ऐतिहासिक भवानी मंडप परिसर. इथं भाविक मोठ्या श्रद्धेनं भवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. पण हे भाविक त्यांच्या त्यांच्या विश्वात इतके रममाण असतात की त्यांना एका नवजात बालिकेला घेऊन तिची आई थंडीत कुडकुडतेय हेही दिसलं नाही. संकेश्वरच्या अर्चना आडे नावाच्या महिलेला गरोदर असतानाही तिच्या नव-यानं घराबाहेर काढलं. त्यामुळं अर्चना आई भवानीच्या शरणाला आली.

तिनं भवानी मंडपाचा आधार घेतला. आपल्या बाळाचा जन्म सरकारी हॉस्पिटलमध्ये व्हावा यासाठी तिनं सीपीआर हॉस्पिटलमध्ये नाव दाखल केलं. पण कागदपत्र चोरीला गेल्यानं ती भवानी मंडपात झोपली होती. रात्री अचानक तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि तिथंच तिची प्रसुती झाली. किमान प्रसुतीनंतर माणुसकीच्या नात्यानं तरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करेल, असं तिला वाटलं पण असं काहीच घडलं नाही.

एक महिला आपल्या नवजात बालकाला घेऊन मंडपात बसल्याचं दिसताच एका व्यक्तीनं आपल्या साथीदारांसह महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती दिली. पण गेंड्याच्या कातडीच्या आरोग्य विभागाला जाग आली तर शपथ. संबंधित घटना माध्यमांना कळताच सीपीआर हॉस्पिटलमधून सूत्र हलली.

पहाटेपासून भवानी मातेच्या दर्शनाला हजारो भाविक येवून गेले. पण एकाही भाविकाला या असाह्य महिलेला मदत करावीशी वाटली नाही. मग अशी भक्ती काय कामाची. उलट दररोज भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारी लक्ष्मी कोरवी आणि तिच्या अन्य सहका-यांनी माणुसकीच्या नात्यानं प्रसुतीच्या वेळी अर्चनाला केलेली मदत खरोखरंच वाखाणण्याजोगी आणि स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

माणसातच देव आहे असं आपण म्हणतो. मग थंडीत आपल्या मुलीला उराशी कवटाळून बसलेल्या या मातेच्या हाकेला का बरं कुणी धावून आलं नाही. यालाच माणुसकी म्हणायची का? 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.