लातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेस आता बिदरपर्यंत धावणार असल्यामुळे लातूरकर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर उदगीरकर आनंदात आहेत. या रेल्वेवरून लातूर विरुद्ध उदगीर-बिदर असा नवा वाद रंगला आहे.
10 वर्षांपूर्वी सुरू झालेली लातूर एक्स्प्रेसचा विस्तार कर्नाटकातील बिदरपर्यंत करण्यात आला आला आहे. त्यामुळे लातूरकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे लातूर-मुंबई एक्सप्रेस कायम ठेवून मुंबई-बिदर अशी नवी रेल्वे सुरु करण्याची लातूरकरांची मागणी आहे. जर बिदरपर्यंत विस्ताराचा निर्णय रद्द नाही केला तर तीव्र आंदोलनाचा इशारा लातूरकरांनी दिलाय. मात्र या रेल्वेमुळे उदगीरकरांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे मोठा भाऊ म्हणून लातूरकरानी हा निर्णय स्वीकारावा असे उदगीरकरांचे मत आहे.
जर उदगीरच्या नागरिकांना या रेल्वेमुळे फायदा होत असेल तर नाराजीचे कारण काय, असा सवाल लातूरचे भाजप खासदार सुनील गायकवाड यांनी केलाय. तर एका ट्रेनसाठी लातूरकरांनी संकुचित भावना ठेवू, नये असे आवाहन बिदरच्या भाजप खासदारांनी केले आहे.
मुंबई-लातूर या रेल्वेचा बिदरपर्यंत झालेल्या विस्ताराचे तीव्र पडसाद सोशल मीडियातून उमटत आहेत. या निर्णयामुळे लातूर विरुद्ध उदगीर आणि बिदर असा तिहेरी वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या निर्णयाचे लातूरमध्ये तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हं दिसत असून यावर आता कसा तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागलेय.