नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वॉर्डचा नाही तर शहराचा विचार करा, अशा सूचना केल्यानं नगरसेवक चांगलेच गोंधळले आहेत. तीन वर्षानंतर आता कुठे कामांना सुरवात होणार होती, त्यातच निधी मोठ्या प्रकल्पासाठी वर्ग करण्याच्या सूचना दिल्याने वॉर्डातील नागरिकांना काय उत्तर द्यायची, अशा विवंचनेत नगरसेवक आहेत.
नाशिकमध्ये सत्ता स्थापन केलेल्या मनसेला बरच काही गमावल्यानंतर आता कुठे सूर गवसू लागलाय. नुकत्याच नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंनी शहरात मोठे प्रकल्प उभारण्यासाठी निधी वळता करा, केवळ वॉर्डचा विचार करू नका, अशा सूचना नगरसेवकांना केल्यायत.
वॉर्डातली छोटी छोटी कामं होत नाहीत. दोन दोन लाखाच्या फाईल्स मंजूर होत नाहीत, वॉर्डातल्या नागरिकांना काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न नगरसेवकांचा आहे. निधी मोठ्या प्रकल्पासाठी द्यायचा की नागरिकांची मूलभूत कामं पूर्ण करायची, अशी काळजी त्यांना आहे.
नाशिककरांसाठी गोदापार्क आणि इतर प्रोजेक्टस महत्त्वाचे असतीलही, पण रस्ते, पाणी, स्वच्छता या मुलभूत सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण आता साहेबांच्या आदेशामुळे नगरसेवक कन्फ्युज झालेत. आणि हे कन्फ्युजन नाशिककरांच्या चिंतेत भर घालणारं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.