तुमची, स्वस्त 'ऑनलाईन' खरेदी आता होणार महाग!

खरेदी सोपी आणि त्यात स्वस्तही... म्हणूनच अनेक जण ऑनलाईन खरेदीला पसंती देतात. मात्र, याच खरेदीला औरंगाबाद महापालिकेनं सध्या ब्रेक लावलाय. 

Updated: Feb 12, 2015, 11:02 AM IST
तुमची, स्वस्त 'ऑनलाईन' खरेदी आता होणार महाग! title=

औरंगाबाद : खरेदी सोपी आणि त्यात स्वस्तही... म्हणूनच अनेक जण ऑनलाईन खरेदीला पसंती देतात. मात्र, याच खरेदीला औरंगाबाद महापालिकेनं सध्या ब्रेक लावलाय. 

औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत ऑनलाईन खरेदी केलेला माल शहरात आल्याबरोबर जप्त करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. कारणही तसंच आहे. शहरात दररोज ५५ लाखांचा ऑनलाईन खरेदीचा माल येतो. मात्र या विक्रीत कुठलाही कर महापालिकेला मिळत नाही त्यामुळं दररोज ३ लाखांच्या एलबीटीला महापालिकेला मुकावं लागतं. २०११ पासून महापालिका हद्दीत एलबीटी लागू झालेली आहे. सगळेच व्यापारी एलबीटी भरतात, मात्र ऑनलाईन खरेदीत एलबीटी भरला जात नाही त्यामुळं यापुढं एलबीटी भरल्याशिवाय हा माल नागरिकांना मिळणार नाही, याची काळजी महापालिका घेणार आहे.

त्यासाठी शहरात आलेला अडीच कोटींचा मालही कुरियर कंपन्यांकडून महापालिकेनं जप्त केलाय. अनेक ऑनलाईन विक्री पोर्टल सध्या कार्यरत आहेत त्यापैंकी फक्त दोन कंपन्यांनीच महापालिकेकडं नोंदणी केलीय. त्यामुळं इतर कंपन्यांकडून आलेला माल आता जप्त करण्यात येतोय. या कंपन्यांना महापालिकेनं नोटीसही बजावल्यायत, अशी माहिती महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी दिलीय. 
 
संबंधित कंपन्या जोपर्यंत एलबीटी रजिस्ट्रेशन करत नाहीत तसंच थकीत कर भरत नाही तोपर्यंत जप्त केलेला माल सोडण्यात येणार नाही आणि यापुढे जर या कंपन्यांनी अशीच विक्री सुरू ठेवली तर त्याविरोधात कोर्टात जाण्याचा विचारही महापालिका करतेय, त्यामुळं औरंगाबादकरांनो, पुढचे काही दिवस ऑनलाईन खरेदी करताना सावधान...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.