नाशिक: जसजशा विधानसभा जवळ येतायत. तसंतसं कांद्याचं राजकारण अधिकच रंगू लागलंय. कांद्याचंच नव्हे तर डाळिंबाचेही भाव घसरल्यानं शेतकरी मोदी सरकारवर नाराज आहे. याचा फटका बसणार हे लक्षात आल्यानं महायुतीचे साथीदार असलेली स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अखेर प्रश्न सत्तेचा आणि मुद्दे तापत ठेवण्याचा आहे.
कांदा... गेल्या चार दशकापासून तापत असलेला हा प्रश्न... कधी भाव अचानक उतरतात तर कधी गगनाला भिडतात. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यात केंद्र सरकारनं कठोर भूमिका बजावलीय. निर्यात दर ऐन मोसमात वाढवल्यानं कांदा तीन हजाराहून थेट 1500 वर येऊन पोहोचला. यामुळं शेतकरी नाराज असून याचा हिसका आम्ही विधानसभेत दाखवू असं सांगत शेतकऱ्यांनी थेट नाराजी व्यक्त केलीय.
ग्राहकाभिमुख निर्णय घेणंही मोदी सरकारसाठी अपरिहार्यता असली तरी, ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मुळावर उठलीए. त्यामुळं सदाभाऊ खोत यांनी थेट केंद्रीय कृषी धोरणावर टीका करत विधानसभेत आम्ही कांद्याचा उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत दिलेत.
स्वभिमानीनं थेट महायुतीला आव्हान दिल्यानं कांदा विधानसभेत अधिकच रंग दाखवणार हे स्पष्ट झालंय. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला जात नाही हे दाखवत शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी राष्ट्रवादीही पुढं सरसावलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.